निर्मल निम्स पुर्जा - जवळपास अशक्य भासणारी कामगिरी, स्वतः:ची ईच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सहजसाध्य करून दाखवणारा एक आगळा किमयागार.
जगात आठ हजार मीटर पेक्षा अधिक ऊंचीची एकूण चौदा शिखरे आहेत. एव्हरेस्ट, K2 (पाकिस्तान), कांचनजुंगा, ल्हाहोत्से, मकालू, चो ओयू, धौलागिरि, मनास्लू, नंगा पर्वत (पाकिस्तान), अन्नपूर्णा, गॅशरब्रम १ (पाकिस्तान चीन सीमेवर), ब्रॉड पिक (पाकिस्तान), गॅशरब्रम २ (पाकिस्तान)आणि शिष पांगमा (तिबेट) - बाकी सर्व नेपाळ मध्ये - १४ ची १४ हिमालयात आहेत.
जागतिक पातळीवर गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील बाप मानला जाणारा राईन हाल्ड मेसनर हा पहिला गिर्यारोहक ज्याने सर्व चौदाच्या चौदा एट थाऊजंडर्स यशस्वीरित्या पादाक्रांत केली. ही विक्रमी कामगिरी करायला त्याने सोळा वर्ष घेतली. साऊथ कोरियाच्या किम चांग हो ने सात वर्ष १०महिन्यात हा पराक्रम केला.
पण निर्मल निम्स पुर्जा ह्या नेपाळी वंशाच्या, इंग्लंड मध्ये स्थायिक असलेल्या अफाट माणसाने फक्त सात महिन्यात हा भीमपराक्रम करून दाखवत गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक नवे विश्व विक्रम प्रस्थापित केले. त्याच्या अद्भुत यशाची गाथा सांगणारा वृत्तपट - 14 Peaks - Nothing is Impossible.
हा भीमपराक्रम करताना निर्मल ने जे विश्व विक्रम प्रस्थापित केले त्यातील काही ठळक विक्रम असे -
* सर्व ८००० मीटर पेक्षा अधिक ऊंचीची शिखरे सर्वात जलद (कमीत कमी वेळात) पादाक्रांत करणे (सहा महिने सहा दिवस)
* सागरमाथा उर्फ एव्हरेस्ट, ल्हाहोत्से व मकालू ही तीन शिखरे ४८ तासांच्या कालावधीत सर करणे
* गिर्यारोहणाच्या उन्हाळी सत्रात सहा एट थाऊजंडर्स सर करणे
* १९८७ नंतर हिवाळी सत्रात K2 यशस्वीरित्या सर करणे
निर्मल पुर्जाने हायब्रीड पद्धतीने (८००० मीटर ऊंची पर्यंत विना ऑक्सिजन आणि त्यावरच्या डेथ झोन मध्ये Bottled Oxygen वापरून ही अशक्यप्राय मोहीम शक्य आणि यशस्वी करून दाखवली. अर्थात ह्या बाबतीत देखील काहींच्या मते, त्याने अल्पाईन पद्धतीने चढाई न करता (पूर्णपणे ऑक्सिजन शिवाय) ही मोहीम केली असल्याने हे खरे विक्रम नव्हेत असे प्रवाद निर्माण झाले.
पण फक्त डेथ झोन मध्ये च bottled oxygen वापरून, केवळ सहा महिने सहा दिवसात सर्व १४ शिखरे सर करणे हे भगीरथ प्रयत्न च आहेत. किंबहुना, अशक्यप्राय अशा काल मर्यादेचे जे आव्हान निर्मलने स्वतः समोर ठेवले होते ते अशा हायब्रीड पद्धतीच्या चढाई तंत्राशिवाय पेलणे शक्यच नव्हते. खुद्द राईन हाल्ड मेसनरनेच ह्या मुद्द्याला पाठींबा दिलाय म्हटल्यावर अजून काय हवं ?
सहा महिने सहा दिवस चाललेल्या या अद्भुत मोहीमेच्या आधीची निर्मल ची तयारी, हा प्रवास सुरू करण्या आधी आणि तो चालू असताना निर्मल समोर उभी ठाकलेली नैसर्गिक तशीच भावनिक आव्हाने आणि त्याने त्यावर मात करत संपादलेले अभूतपूर्व यश या सर्वाची अद्भुतरम्य कहाणी 14 Peaks या वृत्त पटातून आपल्यासमोर येते. निर्मल ने स्वतः निर्माता व छायाचित्र निर्देशक अशी दुहेरी भूमिका ह्या वृत्त पटात निभावत आपली कहाणी जगासमोर योग्य पद्धतीने यावी ही काळजी घेत एक सुरेख वृत्त पट दिला आहे. एक आवर्जून बघायलाच हवा असा वृत्तपट.
मात्र मला स्वतःला भावलेल्या आणि भिडलेल्या गोष्टी म्हणजे हा प्रकल्प राबवताना ज्या अजोड चारित्र्याचे दर्शन निर्मल आणि त्याच्या टीमने दाखवले तो भाग आणि ज्या हेतू ने निर्मल ने हे शिवधनुष्य ऊचलण्याचे ठरवले तो हेतू आणि सहा महिने सहा दिवसांच्या ह्या अद्भुत प्रवासाची यशस्वी सांगता करताना तो त्या हेतू शी कसा प्रामाणिक राहिला हा भाग.
मोहिमेच्या पहिल्या शिखरावरील अन्नपूर्णा वरील यशस्वी चढाई करून बेस कॅम्पला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी निर्मल आणि त्याची टीम दुसऱ्या एका टीमच्या वर अडकून पडलेल्या गिर्यारोहक सदस्याच्या सुटकेसाठी परत वर गेले आणि त्याला सुखरूप खाली घेऊन आले.
एका झटक्यात बेस कॅम्प ते समिट असा छाती दडपून टाकणारा यशस्वी प्रयत्न करत कांचनजुंगा पादाक्रांत करून निर्मल व त्याची टीम खाली येत होती तेव्हा, ऑक्सिजन संपल्यामुळे वर अडकून पडलेल्या एका गिर्यारोहकाला त्यांनी आपल्याकडच्या ऑक्सिजन चा पुरवठा करत जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र खालच्या कॅम्प वरून कोणीही मदतीस न आल्यामुळे / न येऊ शकल्यामुळे निर्मल च्या समोर तो गिर्यारोहक मृत्यू पावला.
रणांगण असो किंवा पर्वत - कोणालाही मागे सोडून पुढे यायचे नाही हा बाणा असलेल्या निर्मल ला ह्यामुळे अतोनात दु:ख झाले. स्वतः जवळपास अकरा तास बिना ऑक्सिजन राहिल्यामुळे त्याला स्वतःला HACE - High Altitude Cerebral Edema चा त्रास सुरू झाला आणि तरी तशा परिस्थितीत, HACE चाच त्रास होत असलेल्या दुसऱ्या गिर्यारोहकाला मदत करत तो खाली घेऊन आला आणि एक गिर्यारोहक मदती विना मरण पावला ह्या बोचऱ्या जाणीवेतून तो अंशत: स्वतः ला समजावू शकला कदाचित.
K2 सर करताना निर्मल आणि त्याच्या टीम ने बेस कॅम्प वर निराश होऊन बसलेल्या इतर गिर्यारोहकांचं मनोधर्यच फक्त ऊंचावलं असं नाही तर त्यांच्या टीम ने फिक्स केलेल्या रोप्स मुळे पुढील दोन दिवसात 24 गिर्यारोहकांना हिवाळी सत्रात K2 पादाक्रांत केल्याचा गौरवास्पद विजय मिळाला.
मानवता, संघटन, संघसदस्यांची काळजी ह्या गोष्टी विक्रमापेक्षा मोठ्या आहेत हे या घटनांमधून निर्मल ने न बोलता स्वतःच्या कृतीमधून दाखवून दिले.
निर्मल ने जेव्हा सात महिन्यात हा भीमपराक्रम करण्याचे नक्की केले तेव्हा जवळपास सर्वांनी त्याला वेड्यात काढण्याचे बाकी ठेवले. सगळीकडून एकच सूर होता - हे अशक्य आहे. म्हणूनच मानवी क्षमता, जिद्द आणि ईच्छाशक्ती ह्यावर आणि स्वतःवर जबर विश्वास असलेल्या निर्मल ने प्रकल्पाचे नावच ठेवले प्रोजेक्ट पॉसिबल.
ही जिद्द, चिवटपणा, ईच्छाशक्ती ह्याच्या सहाय्याने त्याने नैसर्गिक तसेच गिर्यारोहण परवाने मिळण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, आर्थिक बाजू, चढाई चालू असतानाचे आईचे आजारपण या सर्व अडचणींचा देखील यशस्वी सामना करत सर्व पातळ्यांवर मानवी क्षमता किती अफाट असू शकते हे सिद्ध केले.
दुसरा आणि महत्त्वाचा हेतू. अगदी एडमंड हिलरी पासून आजपर्यंत सर्व यशस्वी अयशस्वी गिर्यारोहण मोहिमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या शेर्पा मंडळींची निव्वळ शेर्पा म्हणून जगापुढे येणारी ओळख बदलणे. प्रत्येक शेर्पा ला स्वतः चे नाव आहे, एक व्यक्तिविशिष्ट ओळख आहे. तो त्या नावानिशी जगापुढे यायला हवा.
निर्मलच्या मते नेपाळी गिर्यारोहक हे जगातील सर्वश्रेष्ठ गिर्यारोहकांपैकी असून जगाला व त्यांना स्वतःला ही ओळख करून देणे आवश्यक आहे. म्हणूनच त्याच्या टीम मधील सर्व गिर्यारोहक सदस्य - मिंग्मा डेव्हीड शेर्पा, गेलजेन शेर्पा, गेसलन तमांग, लाकपा देंडी, तेनसी कसांग हे नेपाळी शेर्पा होते. प्रोजेक्ट पॉसिबल यशस्वी झाल्यावर ह्या टीममधील नेपाळी गिर्यारोहकांपासून इतर नेपाळी गिर्यारोहक सुद्धा स्फूर्ती घेतील आणि स्वतःचे आयुष्य बदलू शकतील हा तो दुसरा हेतू.
निर्मल चा १० तास १५ मिनिटात एव्हरेस्ट आणि ल्हाहोत्से सर करण्याचा विक्रम मिंगमा दोरची शेर्पा ने सहा तास एक मिनिटांच्या नवीन विश्व विक्रमी वेळात ही दोन शिखरे सर करून मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसेच दहा वर्षांपूर्वी एव्हरेस्ट सर करून जवळपास निम्सच्या पुढे मागे सर्व चौदा शिखरे पादाक्रांत करणारा मींगमा ज्ञाबू शेर्पा सर्वात लहान वयात सर्व चौदा शिखरे सर करणारा गिर्यारोहक बनला ही दोन्ही उदाहरणे बदलत्या परिस्थितीचा द्योतक आहेत. आज निम्सच्या नावाने गूगल सर्च करताना ही नावे सुद्धा पुढे येतात ही एक प्रकारे प्रोजेक्ट पॉसिबलच्या हेतूची यशस्वी पूर्तता म्हणायला हवी.
मानवी क्षमतेवर प्रचंड विश्वास असलेल्या निर्मल निम्स पूर्जाच्या अफाट कर्तृत्वाला सादर नमन.
-- मनिष मोहिले.
No comments:
Post a Comment