Sunday, August 7, 2022

मैत्री दिन २०२२

शाळेत लहान वर्गात दोन दोनच्या जोड्या करून चालणं

मधल्या सुट्टीत एकमेकांच्या डब्यातला खाऊ हक्कानी घेणं आणि देणं

खेळताना होणारी भांडणं आणि ती कळत नकळत मिटणं

मित्रांच्या मस्तीची चुगली न करता, एकत्र वर्गाबाहेर अंगठे पकडून उभं रहाणं

मित्राच्या crush affair मध्ये सल्लागार बनताना स्वत:च्या crush affair मध्ये सल्ला मागणं

अभ्यासाच्या नावाखाली रात्री जागवणं आणि अभ्यासाशिवाय इतर सर्व फालतू गप्पा करणं 

पाठीवर शिधा घेऊन उन्हापावसाचे किल्ले चढत थरार अनुभवणं

भरदुपारी; तर कधी रात्री उशिरापर्यंत गाण्याच्या, श्रवण भक्तीच्या मैफिली जमवणं


नंतर व्यवहाराच्या धकाधकीत सुद्धा काही अशीच अहेतुक नाती जुळणं

प्रत्येक छोट्या मोठ्या achievement वर प्रोत्साहन देणं, कौतुक करणं

कुठल्याही परिस्थितीत मी आहे तुझ्याबरोबर हा विश्वास देणं आणि मिळणं

हातातल्या "सागर" मधून मनाच्या सागरांचे शब्दातून किंवा शब्दावाचून व्यक्त होणं

सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थपूर्ण पोस्ट्स किंवा निरर्थक टाईम पास वाली पोस्ट्स शेअर करत प्रत्यक्षातील अंतराला मनानी एकदम जवळचं बनवणं

प्रत्यक्षात किंवा फोनवर, WhatsApp वर भांडणं, वाद घालणं आणि झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत परत दिलजमाई करणं


आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर वर्तमानात इकडे तिकडे बघताना आणि मागे वळून बघताना काही चेहरे, काही नावं, काही आठवणी - सुखाच्या, दु:खाच्या, कडू, गोड - हे सगळं आठवत राहाणं 


आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींना एक छोटं आणि साधं नाव आहे -


मैत्री.


मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


मनिष मोहिले







No comments:

Post a Comment