Sunday, October 22, 2023

सावळबाधा

तो निळा सावळा देह, दे आठव आकाशाची

रंगते निळ्या रंगात, देखणी गौर कांतीची

लाघव्य नील रंगाचे, तिज होई सावळबाधा

तो निळा सावळा कान्हा, ती होते त्याची राधा


जादू ही युगायुगांची, वेणूच्या सप्तसुरांची

सात जागांमधूनी श्वास, आठवी कृष्णप्राणाची

जादू ही भारते तिजला, तिज होई सावळबाधा

तो निळा सावळा कान्हा, ती होते त्याची राधा


मखमल ही मोरपिसाची, पखरण जणू इंद्रधनूची

ही जाणीव नवसृजनाची, कोवळी तिच्या ह्रदयीची

नव सर्जन फुलवे तिजला, तिज होई सावळबाधा

तो निळा सावळा कान्हा, ती होते त्याची राधा


---- मनीष मोहिले 


No comments:

Post a Comment