Monday, September 30, 2024

स्वतःला वर देणारा भस्मासूर

 स्वतः ला वर देणारा भस्मासूर


दिनांक २८ सप्टेंबर २०२४ च्या TOI मध्ये एक बातमी होती. ग्लोबल वाॅर्मिंग मुळे अंटार्क्टिका मधले लाखो वर्ष पूर्वी पासून असलेले ग्लेशियर वितळत आहे. ह्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील समुद्र पातळीत देखील वाढ होत आहे. काही विशिष्ट पेंग्विन प्रजाती किंवा इतर प्राणी ज्यांच्या अस्तित्वासाठी बर्फ अनिवार्य आहे, अशा प्रजातींसाठी ही मृत्यूघंटा आहे आणि आपल्या कल्पनेपेक्षा खूप लवकर आपल्याला सुद्धा ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जागतिक पातळीवर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ, पाण्याचे वाढते तापमान ह्यामुळे वर्षानुवर्षांचे वातावरणीय आकृतीबंध बदलणे, ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरिका इतक्या मोठ्या विस्तारात समुद्री प्रवाळ परिस्थितीकी ला गंभीर इजा होणे ह्या काही भयंकर धोकादायक बाबी गेल्या काही वर्षात नजरेसमोर आल्यात.


अर्थात, विविध प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतोनात वापर ह्या मुळे जागतिक तापमानात होणारी वाढ, पर्यावरणाचे संतुलन बिघडणे ह्या सारख्या वाईट परिणामांची मानवाला कल्पना आलेली आहे आणि त्यामुळेच सेंद्रिय शेती, उद्योगधंद्यात पाण्याचा पुनर्वापर, अक्षय ऊर्जा, इत्यादी तोडग्यांद्वारे मानव जात हा भेडसावणारा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहे. परंतु, खरोखरच हे उपाय पुरेसे आहेत का ? आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हे योजले जाणारे उपाय मुळात खरोखर पर्यावरणासाठी हितावह आहेत का ?


उदाहरणार्थ, अक्षय ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा; आणि गेल्या काही वर्षात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. भारतात सुद्धा आता ह्या गोष्टीने जोर पकडलेला आहे. आणि इथेच, २८ सप्टेंबरच्या TOI मधली दुसरी बातमी महत्वाची ठरते. ह्या बातमी प्रमाणे, २०३० साला पर्यंत भारतातील सौर ऊर्जा निर्मिती उद्योगामध्ये जो कचरा (waste टाकाऊ भाग) निर्माण होईल, त्यात ६७% इतकी वाढ होईल. हा कचरा, जमीन (माती) तसेच पाणी हे दोन मुख्य स्त्रोत अथवा दोन मुख्य संसाधने प्रदूषित करू शकतो जर ह्या कचऱ्याचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर. कारण ह्या कचऱ्यात प्रामुख्याने heavy metals, silicon, फिल्म मध्ये असणारी रासायनिक संयुगे इत्यादी गोष्टी असतात ज्या हे प्रदूषण घडवण्यास कारणीभूत ठरतात. हा कचरा मुख्यत्वे करून निर्माण होतो सौर पॅनल च्या साधारणतः २५ वर्षाच्या उपयुक्त आयुर्मर्यादे नंतर. आता जर हे व्यवस्थापन नीट झाले नाही तर आज हरित किंवा अक्षय ऊर्जा म्हणून किंवा पर्यावरणास अनुकूल असे पर्याय म्हणून आपण ज्या गोष्टीचे कौतुक करतोय त्याच गोष्टी किंवा त्यांचे उत्पादन यातून भविष्यातील पर्यावरण संबंधित समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब इतकीच आहे की ह्या waste चा पुनर्वापर कसा होऊ शकतो ह्याबद्दल राज्यस्तरीय प्रदूषण नियामक मंडळ आत्तापासून विचार विमर्श करत आहे, उपाय योजना शोधत आहे. 


अशा अनेक गोष्टी आहेत. उदा. आज ज्या EV vehicles (विद्युत चलित वाहने) चा बोलबाला आहे त्यातील विद्युत घट अर्थात battery. एकदा का त्या battery चे उपयुक्त आयुष्य संपले की तिची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आहेच.


अवकाशातील निरुपयोगी कृत्रिम उपग्रहांच्या अवशेषांचा कचरा, अती दुर्लंघ्य जागा जसे एव्हरेस्ट, उत्तर दक्षिण ध्रुव, महासागरात अती खोल जागी अशा ठिकाणच्या शोध मोहिमेत निर्माण झालेला कचरा ह्या इतर काही चिंतेच्या बाबी.

अर्थात म्हणून ह्या काही गोष्टींचे जे फायदे आहेत ते दुर्लक्ष करावे असे आहेत असे नाही. मात्र, त्यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या टाकाऊ गोष्टींची योग्य विल्हेवाट हा एक महत्त्वाचा प्राथमिक निकष मानला गेला पाहिजे अशा प्रकल्पांच्या प्राथमिक मूल्यमापनाच्या (primary evaluation) वेळीच.


नाहीतर, एकीकडे अशा शोधाना वरदान मानत, त्याच वेळेस दुसरीकडे आपण वेगळ्या प्रकारच्या विनाशाची बीजे रोवीत असू कदाचित.


पुराणातील भस्मासूर महादेवाकडून वर मिळून उन्मत्त झाला आणि ज्याचे त्याचे भस्म करीत सुटला. इथे, कलियुगात मानव हाच भस्मासूर आहे जो स्वतःच स्वतःला वैज्ञानिक शोधांचे वर देऊन उन्मत्त होत चालला आहे. ह्या भस्मासुरी प्रवृत्तीचा पराभव करू शकणारी मोहिनी नक्की कोण असेल आणि ती कधी अवतरेल हा आजचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.


मनीष मोहिले

No comments:

Post a Comment