Friday, July 24, 2020

वृक्ष, शिक्षण आणि ज्ञानांकुर


वृक्ष, शिक्षण व ज्ञानांकुर
आज सकाळी ऑफीसला जाताना एक अतिशय सुरेख विचार अतिशय अनपेक्षितरित्या मला ऐकायला मिळाला - वृक्ष आणि ज्ञान ह्यांच्यातील अन्योन्यसंबंधाबद्दलचा.
तर झालं काय की नेहमीप्रमाणे मी ऑफीसला जाताना रेडीओ मिर्ची लावली होती गाडीत. सकाळच्या त्या वेळात बहुधा आर.जे. म्हणून ध्वनित असतो.  रेडीओ मिर्चीवरचा एक अत्यंत लोकप्रिय व खूप मोठा चाहतावर्ग असलेला आर.जे. मला देखील तो आवडतो आणि ह्याचं कारण तो इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांना हात घालणारे विविधस्पर्शी कार्यक्रम सादर करतो की श्रोत्यांना मनोरंजनाबरोबरच माहिती, सकारात्म्कता अशा बऱ्याच गोष्टी मिळतात.
सध्या म्हणजे साधारण जुलै महिन्याच्या मध्यापासून तो त्याचा ट्री इडियट नावाचा जो वार्षिक सार्वजनिक वृक्षारोपण कार्यक्रम असतो त्याच्याशी व पर्यायाने वृक्षसृष्टीशी संबंधित माहिती,  कविता, वनौषधीशास्त्र, मुलाखती असे कार्यक्रम सादर करतोय. ह्याच कार्यक्रमा अंतर्गत आज त्याने वृक्षप्रेमी अशा महादेविया कुटुंबातील डॉ. बन्सुरी महादेविया ह्यांची मुलाखत घेतली.  रेडीओवर मुलाखत घेण्यासारखं काय खास आहे ह्या कुटुंबाच्या वृक्षप्रेमात ?
घराच्या अंगणात, भवतालच्या बागेत पुष्कळ झाडे असलेली बरीच घरं असतात. पण महादेविया कुटुंबाच्या घराच्या मधोमध आकाशावेरी जाणारे  पूर्ण वाढलेले एक सोडून दोन वृक्ष आहेत. एक आहे कदंब आणि दुसरा बिल्व. रहातं घर वाढवताना हे वृक्ष न कापता त्यांच्या भोवताली बांधकाम करण्यामागे ह्या कुटुंबाची नक्की काय भूमिका होती ? काय कारण होतं ?
डॉ. बन्सुरीनी ह्या प्रश्नाचं फार सुरेख उत्तर दिलं. त्या म्हणाल्या हिंदू पौराणिक कथांप्रमाणे विचार करता ही दोन्ही झाडं खूप खास आहेत. कदंबाच्या झाडाखालीच राधा कृष्णाचं सखा सखीचं जगावेगळं आणि सर्वांसाठी आदर्श असं प्रेम फुललं आणि बिल्वपत्र शंकराला किती प्रिय असतात हे आपण सर्वच जाणतो. तेव्हा शंकराच्या सुरक्षाकवचात कुटुंबातील सर्वानी प्रेमाने एकत्र रहावं हे एक कारण. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे झाडं शिक्षणाचं - education - प्रतीक आहेत. कारण education ह्या शब्दाची व्युत्पत्ती पहाता त्याचा अर्थ आतून वाढ व विकास होणे असा आहे.
हे दुसरं कारण ऐकलं आणि माझे कान टवकारले. मला ते कारण फार आवडलं. अगदी अंत:करणाला भिडलं म्हणा ना !
एज्युकेशन - education हा शब्द educatio / educo ह्या मूळ लॅटीन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे - प्रजनन (breeding), संगोपन (rearing), नेतृत्वातून पुढे नेणे (leading forth), तून / पासून निर्माण करणे - e - from / out of. Duco - building / erecting.
ही व्युत्पत्ती वाचली आणि जाणवलं की शालेय / महाविद्यालयीन पुस्तकी/ प्रत्यक्ष प्रयोग शिक्षण व त्याचा अभ्यासक्रम हा education चा जो रुढ झालेला अर्थ समोर येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल अर्थ दडला आहे ह्या शब्दात.
ह्या व्युत्पत्तीच्या संदर्भात - त्यातील एक एक अर्थ घेऊन आता आपण एज्युकेशन चा शब्दार्थ व भावार्थ आणि त्या त्या अर्थासंदर्भात वृक्ष कसे चपखल बसतात हे पाहू व पारखू.

एज्युकेशन च्या शब्दार्थात असा कोणताही अभ्यासक्रम ज्यामुळे ज्ञान / कौशल्य मिळते वा वृद्धींगत होते, त्याचा अंतर्भाव तर  होतोच पण त्याही पलीकडे जाऊन अशी कोणतीही कृती, अनुभव, प्रयोग, छंद, साधना ज्यामुळे आपली आंतरिक वाढ व विकास होतो - माहितीचा असेल, कौशल्याचा असेल, चांगुलपणाचा असेल, प्रगल्भतेचा असेल, आनंदाचा असेल - ती प्रत्येक कृती, अनुभव, प्रयोग, छंद, साधना हे शिक्षणच आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची अशी वाढ व विकास की ज्यामुळे जगात काही सकारात्मक निर्मिती होइल, असा विकास घडवून आणतं ते खरं शिक्षण. त्यासाठी पुस्तकी शिक्षण झालं असलंच पाहीजे असं नाही. आईनस्टाईन, बिल गेट्स ही अशा शिक्षणामुळे झालेल्या आंतरिक विकासातून जगासाठी काय योगदान दिलं जाऊ शकतं ह्याची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. किंबहुना असे सर्व शास्त्रज्ञ, कलाकार, संत, समाजसेवक, ज्यानी शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणात मोठ्या पदव्या नसतील मिळवल्या पण स्वत:च्या ज्ञानातून, कलेतून  समाजाला, जगाला युगानुयुगं मदत होइल, आनंद मिळेल असं काम केलं. हे शिक्षण पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पलीकडचं शिक्षण आहे कारण ते आतून अंकुरून बाहेर आलं आहे. हे अंकुरणं हे तर वृक्षसृष्टीचं सर्वात महत्वाचं व प्राथमिक लक्षण आहे.

हे आतून विषय समजणं व त्यामुळे विकास होणं ही प्रक्रियाच वेगळी असावी.  ह्या संदर्भात माणसे : अरभाट व चिल्लर ह्या जी ए कुलकर्णींच्या आत्मचरित्रपर पुस्तकातील त्यांच्या शालेय जीवनातील दोन आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत त्यांची आठवण मला होते.
पायथागोरसचा प्रमेय ते जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिक्षकांची शिकवण्यातील व जीएंची शिकण्यातील एकतानता आणि वैश्विक उर्जा ह्यांचा असा काही मिलाफ झाला की समजवण्यासाठी आणलेले काटकोन त्रिकोण आणि त्याच्या कर्णावर व इतर भुजांवर ठेवण्यासाठी आणलेले भिन्नरंगी चौरस हे कसे आपल्यासमोर फळ्यावर वितळून जाऊन एकमेकात मिसळले व काटकोन त्रिकोणाच्या रंगात व आकारात एकरुप झाले आणि कसे त्यातून परत फुटून निघत आपापल्या रंगात व आकारात नेमलेल्या जागेवर परत गेले ह्याचं ऐकून वा वाचून समजायला अवघड आणि केवळ स्वानुभवातूनच ज्याची अनुभूती शक्य आहे अशा अनुभवाचं फार सुरेख वर्णन जीएंनी केलं आहे.
दुसरा अनुभव आहे राम गणेश गडकऱ्यांनी लिहीलेली चिमुकलीच कविता जेव्हा त्यांना शिकवली गेली तेव्हाचा. त्यातील एका ओळीपाशी त्यांना असाच थरारून टाकणारा अनुभव आला. लहान मुलीचं मोठ्या स्त्रीत होणाऱ्या स्थित्यंतराचं रुपक अशा त्या कवितेत एक अशा अर्थाची ओळ आहे की तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे जणू ब्रह्मदेवाने तिचं विधिलिखित लिहीताना वापरलेलं दशांश चिन्ह आहे. ह्या ओळीपाशी त्यांना असा भास झाला की जणू ब्रह्मदेव लेखणी घेऊन बसलाय विचार करत आणि त्याच्या आज्ञेची वाट बघत ते टिंब त्याच्या समोर तरंगत आहे. आता हे अनुभव अतिशय वैयक्तिक पातळीवरचे आहेत. पण ते असे आहेत की बीजातून कोंब फुटावा तसे ते जीएंच्या जाणीवेतून बाहेर आले असतील की जे ते कधीच विसरणार नाहीत. ते अनुभव व त्याचबरोबर ते पायथाओरसचे प्रमेय व ती चिमुकलीच कविता. हे जे ज्ञान आहे ते झाडं ज्याप्रमाणे आतून उफाळून शब्दातीत अशा सृजनशील उर्जेतून बाहेर येतात, वाढतात त्या सृजनशील ओढीशी व वाढीशी साधर्म्य सांगणारं आहे.

एज्युकॅटीयो चा दुसरा अर्थ आहे breeding - प्रजनन.  आणि rearing - संगोपन. अर्थ म्हणून शिक्षणाचा काय संबंध प्रजननाशी ? हे प्रजनन आहे आपल्याला मिळणारं ज्ञान व कौशल्य ह्यांचा आपल्या  आत्म्याशी / व्यक्तिमत्वाशी होणाऱ्या संकरातून निर्माण होणारं वाढीव व विकसित भरीव
ज्ञान ज्यामुळे एकंदरीत माहितीसाठ्यात, ज्ञानात कौशल्यात अशी भर पडेल की ज्याचा उपयोग करून इतरही स्वत:चा विकास करून घेऊ शकतील - मग तो भौतिक असेल, तात्विक असेल, आध्यात्मिक असेल.  एका ज्ञानदीपकातून अनेक ज्ञानदीपक तेवावेत तसा. म्हणून मला इथे प्रजनन पेक्षा संकर हा शब्द अधिक चपखल बसेल असं वाटतं. ज्ञान, माहिती व कौशल्य ह्यांचा विवेकबुद्धी, संस्कार, कला, व्यक्तिमत्त्व व आत्मा ह्यांच्याशी संकर घडवून वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर विकास घडवून आणतं ते खरं शिक्षण - एज्युकेशन.  असा संकर जेव्हा संस्कार व विवेकबुद्धी ह्यांच्याबरोबर होतो तेव्हा एक प्रगल्भ, परोपकारी व्यक्तिमत्व विकसित होतं जे असं शिक्षण इतरांना देण्याचा प्रयत्न करतं. ज्ञान वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करतं. असा संकर सुसंस्कारित कलेबरोबर होतो तेव्हा संपूर्ण जगासाठी आनंदनिधान बनणाऱ्या कलाकृती निर्माण होतात आणि; असा संकर जेव्हा आत्म्याबरोबर घडतो तेव्हा आध्यात्मिक उन्नती होते आणि अशी एक एक पायरी वर चढत गेले की आत्मज्ञान प्राप्त होते. गौतम बुद्धाला हे आत्मज्ञान बोधिसत्व वृक्षाखाली झालं; तर गुरुदेव रवींद्रनाथांच्या वडिलांना - महर्षी देवेंद्रनाथांना सप्तपर्णीच्या वृक्षाखाली. वंगचित्रे मध्ये पुलं नी म्हटल्याप्रमाणे सात सूर व सात रंगांचं प्रतीक असलेली सप्तपर्णी. ज्ञानाबरोबर कला असली की ती ज्ञानाला विधायक बनवते. सुसंस्कारित बनवते. आत्मज्ञान तेव्हाच शक्य आहे.
संगोपनाच्या बाबतीत बोलायचं तर प्राणवायू निर्माण करत, जमिनीची झीज कमी करत, तपमान नियंत्रण करत संपूर्ण पृथ्वीवरील पर्यावरणाचं रक्षण करत समस्त सजीवसृष्टीचं संगोपन करणाऱ्या वृक्षांबद्दल अजून काय वेगळं लिहायचं वा बोलायचं?

म्हणजे पहा, कदंब, बोधिसत्व, सप्तपर्णी आणि बेल ह्या रुपातून वृक्षसृष्टी प्रेम, ज्ञान, व संरक्षण / संगोपन ह्याच्याशी प्रतिकात्मक जोडलेली आहे. 

एज्युकेशन शी निगडीत तिसरा अर्थ - नेतृत्वातून पुढे नेणे. जी व्यक्ती व जे व्यक्तिमत्व अशाप्रकारे आतून अंकुरून विकसित झालेलं आहे त्याच्याकडे  सहजीविकांना, समाजाला आंतरिक विकासदायी शिक्षण देण्याची जबाबदारी व नेतृत्व स्वत:हून चालून येते. हे नेतृत्व आहे विधायक व निर्मितीक्षम अशा वाढ व विकासाचं. लक्षात घ्या - तेच शिक्षण खरं जिथे फक्त वाढ नाही तर वाढीबरोबरच विकास देखील होतो आणि ज्यातून विधायक कार्य घडतात . प्राणीसृष्टीच्या आधी निर्माण झालेल्या  वनस्पती सृष्टीचं  नेतृत्वाच्या बाबतीत  महत्व वेगळं विशद करायची गरज नाही.

एज्युकेशनशी निगडीत चौथा अर्थ - तून निर्माण करणे / उभारणे. ही निर्मिती आहे, ही उभारणी आहे सद्भावना/ पत  (goodwill) आणि वारसा (legacy) ची. असं शिक्षण जे आतून विकसित व्हायला मदत करतं;  त्याचा अजून एक मूलभूत हेतू असतो एका व्यक्तीच्या आयुष्यकालानंतर देखील हे सत्-कार्य पुढे चालू रहावं हा. व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व आतून विकसित करणारं जे शिक्षण असतं ते अशा भविष्यकालातील पिढ्यांच्या ज्ञानवृद्धी व विकासाचा देखील विचार करतं. जागोजागी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी शिक्षण / समाजसेवी संस्था ही अशी,  एका व्यक्तीच्या आयुष्यकालानंतरही कार्यरत असलेल्या शिक्षणप्रक्रीयेची व ह्या लेखात विचाराधीन असलेल्या शिक्षणाच्या संदर्भात शिक्षणकेंद्राची प्रतिके आहेत. झाडं देखील कोळशाच्या रुपाने प्रत्यक्ष सृष्टीत आणि विविध सुरेख रुपकातून विचारसृष्टीत असे सद्भावना वारसे कायम ठेऊन देतात.

थोडक्यात, व्युत्पत्तीप्रमाणे एज्युकेशन - शिक्षण हा  पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पेक्षा खूप काही अधिक अर्थ असलेला शब्द व प्रक्रिया आहे आणि वर बघितलेल्या सर्व अर्थांच्या संदर्भात वृक्ष / झाडं प्रत्येक अर्थात चपखल उदाहरण म्हणून बसतात ज्यात सर्वात महत्वाचं उदाहरण आहे अंकुरणं - आतून होणारा विकास - ज्ञानांकुरातून फुटणारा आणि आतून वाढणारा व विकसित होणारा जो पुढे जाऊन बनतो कदंब, बिल्व, बोधिसत्व आणि सप्तपर्णी.


---- मनिष मोहिले.





No comments:

Post a Comment