Tuesday, June 27, 2017

प्रायोगिक गझल सदृश्य कविता

काही दिवसांपूर्वी श्री. इलाही जमादार यांची एक खास गझल वाचनात आली ज्यात एक ओळ हिंदीत होती आणि एक मराठीत.

हाताळण्यास अतिशय कठीण अशा या काव्यप्रकारात श्री इलाही यांचं प्रभुत्व आहे.

ती गझल वाचल्यापासून आपण ही असा प्रयत्न करावा असं मनानी घेतलं होतं. आज त्या धर्तीवर काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिलाच प्रयत्न म्हणून ज्या उणीवा असतील त्यांना माफ कराल ही आशा.

देख लूँ चेहरा तेरा, ईद हैं मत कर मना
कर ऊन्हाचे चांदणे, हासून गाली एकदा

महकती साँसें तुम्हारी, बाग इन में हैं बसा
कर फुलांनाही सुगंधी, वसंत दारी थांबला

हैं घनेरी जुल्फें तेरी, या हैं छायी बदलीयाँ
कर नजर सतरंगी फुलवून,  सुस्नात केसांचा फुलोरा

पंछी, झरनों संग हवाएँ, गीत गाती हैं सदा
भर सुन्याशा जीवनी या, मधुर प्रीतीच्या सुरा

खुबियाँ कुदरत की सारी, तुझमें बसी हैं जाने जा
मन मंदिरी मूर्ती तुझी,  अन् तूच माझी देवता

-- मनिष मोहिले 

Sunday, June 25, 2017

बोलावा विठ्ठल - अहमदाबाद - तृतीय वर्ष

बोलावा विठ्ठल - अहमदाबाद - तृतीय वर्ष

शुक्रवार २३ जून २०१७ साधारण वर्षभरानंतर परत एकदा आषाढ महिन्याच्या निमित्ताने बोलावा विठ्ठल चा कार्यक्रम अहमदाबादेत संपन्न झाला. सलग दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला हे आमचं भाग्यच म्हणायचं.

गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी अजूनपर्यंत हुलकावण्या देणाऱ्या वरुणराजाने सुद्धा नेमकी हजेरी लावली. जणू भक्तीरसात न्हाऊन काढणाऱ्या या अभंगवाणीच्या वर्षावात चिंब भिजून जायला खुद्द वरुणराजा सुद्धा ऊत्सुक होता.

त्याच्या आणि पावसापाण्याचं अहमदाबादच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संगीत रसिक श्रोत्यांच्या अपेक्षा, कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी अपेक्षेपलीकडे पूर्ण केल्या असंच म्हणावं लागेल.

पंचम निषाद प्रस्तुत बोलावा विठ्ठल च्या अकरा वर्षांच्या परंपरेनुसार राहुल देशपांडे, सावनी शेंडे व जयतीर्थ मेवुंडी या तिघा दिग्गज गायक कलाकारांनी जय जय रामकृष्ण हरी या गजरातून कार्यक्रमाची सुरूवातच, एका अफलातून उंचीवर केली. जणू पुढे सरकताना हा कार्यक्रम कोणती ऊंची गाठणार;  ह्याची झलकच दाखवली. आणि मग शशी व्यास यांच्या अद्भुत समयोचित नेमक्या निवेदनानंतर सुरू झाली अभंगवाणीची बरसात - खास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ढंगानी.

मिळे आवडीचे सुख तुझे श्रीहरी मुख या अभंगानी सुरूवात करत सावनी शेंडेनी श्रीहरीच्या मुख दर्शनाने मिळणाऱ्या सुखाला सुरान्मधून श्रोत्यांपर्यंत पोचवत त्यानाही त्या सुखाचा अनुभव दिला. सुरूवातीलाच असं मुखदर्शन सुख मिळाल्यावर अबीर गुलालाचे सूर रंग मैफिलीवर उधळले जावेत हे स्वाभाविकच होतं. ह्या सूरसुखातून आणि सूररंग उधळणीतून अशी तल्लीनता आली की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,  करावा विठ्ठल जीवभावे;  ह्या संतांच्या जीवनपद्धतीची सहज ओळख श्रोतृवृंदाला झाली आणि अशा तऱ्हेनी कलाकार व श्रोते यांचं भक्तीरसातून अद्वैत होताच अवघा रंग एकची जाहला आणि साक्षात श्रीरंगही त्या रंगी रंगून गेला असेल तर नवल नाही. अतिशय सहजपणे आपल्या गोड गळ्यातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भारदस्तपणाचं दडपण श्रोत्यांना जाणवू न देता,  सावनीने चारही अभंग सादर केले आणि मैफिलीची सुरेख व सुरेल सुरूवात करून दिली.

त्यानंतर आलेल्या राहुल देशपांडेनी परत त्याच्या नजरेतून विठूचं दर्शन घडवलं. आपल्या मुखदर्शनाने सावनीला सुख आवडीचे देणारा श्री हरी राहुलला कसा दिसला ? तर पंढरपुरीचा निळा, विठो देखियेला डोळा, लावण्याचा पुतळा. काय ती भक्ती!  त्या निळ्या विठोचं लावण्य साक्षात शब्दसुरातून साकार झालं; आणि मग विठूभक्तीत, अभंगवाणीत न्हाऊन निघालेला जथा वैष्णवांचा पंढरीस निघाला. त्या संगीत दिंडीला पुढे नेत होता राहुल देशपांडे.  अशा या अभंगरसात तल्लीन झालेल्या श्रोतृवृंदाला राहुल नी मग एका वेगळ्याच तालावर डोलायला लावलं. भक्तीरसाला अद्भुततेची खोल जोड देणाऱ्या त्या तालावर डोलणाऱ्या श्रोत्यांना,  त्या लक्ष्मीवल्लभाच्या पायी वसलेल्या सुखाचं दर्शन घडताच , राहुलचे सूर कानी साठवत मनोमन सर्व त्या नादब्रह्माशी समरस झाले. आपल्या कसदार, दमदार आणि रियाजानी तयार अशा सुरेख गात्या गळ्यातून राहुलने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा रुबाब आणि आब कायम राखून सुद्धा श्रोत्यांना आपलंसं करत स्वत:ला आकळलेल्या भक्तीमार्गावर नेलं आणि कळत नकळत मनोमन सर्व त्या लक्ष्मीवल्लभाच्या पायी नतमस्तक झाले. आणि जेव्हा अशा भक्तीभावाने भक्त त्या विठूच्या पायाशी नतमस्तक होतात ना, तेव्हा वेदांनाही ज्याचा अंत वा पार कळलेला नाही; असा विठू भक्तांसाठी मात्र त्यांची कामं सहज करताना दिसतो - तो कुणाची गुरं राखतो तर कुणाकडची खीर चाखतो.

काय चमत्कार आहे  ! आणि हा चमत्कार घडण्यामागचं कारण सांगितलं राहुल नंतर व्यासपीठावर आलेल्या जयतीर्थ मेवुंडीनी की देव भावाचा भुकेला आणि म्हणून वैकुंठ सोडूनी आला. नुसताच आला नाही;  तर भक्तांची कामं केली. हा भक्तांपासून दूर रहाणारा देव नाही. जे खऱ्याखुऱ्या भक्तीभावाने त्याला साद घालतात,  त्यांच्या मदतीला तो भावभुकेला धावून येतो. तिथे मग भाषेचंही बंधन आड येत नाही. जणू हे सिद्ध करायलाच जयतीर्थ मेवुंडीनी पुढचा अभंग कन्नड भाषेतला घेतला. शब्द कळत नसले तरी त्या कान्हड्याला साद घालणारा तो लडिवाळ भाव, ते गोड प्रेम, सूरासूरातून श्रोत्यांच्या मनात झिरपत होतं.  आपल्या किराणा घराण्याच्या गायकीच्या वैशिष्ट्याची झलक देत व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत जयतीर्थनी हे अभंग सादर केले.

आणि मग अशा ह्या भक्तीरसपूर्ण वातावरणानी भारलेल्या मैफिलीच्या भैरवीसाठी साक्षात वाद्ये सजीव झाली आणि टाळानी चिपळीला बोलावलं की ये आणि माझ्यासंगे नाच. आणि मग काय विचारता महाराजा - देवाजीच्या दारी रंक राव ह्या भेदभावाशिवाय सगळे एकरुप झाले आणि अभंगरंग साक्षात रंगला.

एक विलक्षण संगीतानुभूती मिळाली होती. राहुल देशपांडे,  सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी या गायक कलाकारांबरोबरच त्यांना विविध वाद्यांवर ज्यांनी साथ केली - पेटीवर आदित्य ओक, तबल्यावर साई बॅंकर, पखावजवर प्रकाश शेजवळ, झांज, चिपळ्या व इतर साईड ऱ्हिदम वाद्य लीलया वाजवणारे सूर्यकांत सुर्वे आणि या सर्व दिग्गज कलाकारांच्या मध्ये, भक्तीला, कलेला व कलागुणाना वयाची अट नसते हे पटवून देणारा युवा बासरी वादक एस आकाश - या सर्वांनी मिळून ही संगीतदिंडी, संगीतवारी मनाच्या पंढरपुरीत पोचवली.  गायकांच्या गात्या गळ्यातील चमत्कारी सूराना तितक्याच तोलामोलाच्या चमत्कृतीपूर्ण  व रियाजसिद्ध वाद्यवादनानी साथ देत या सर्व कलाकारानी ही संध्याकाळ संस्मरणीय केली.

पण वैयक्तिकरित्या मला या संगीतानंदाशिवाय एक अनोखी भेट मिळाली. वारी मागची पार्श्वभूमी माझ्यापुरती मला कळली. आपलं प्रत्येकाचं जीवन ही एक वारीच आहे. आणि जसं आध्यात्मिक वारीत त्या विठूच्या दर्शनासाठी वारकरी मैलोनमैल वाट तुडवत जातात आणि विठोचं दर्शन घेऊन कृतकृत्य होतात; त्याप्रमाणे आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातील अत्त्युच्च शिखर म्हणजेच विठो भेटावा म्हणून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत  सतत प्रयत्न करणं ही वारीच आहे. ही वारी प्रत्येकाची स्वत:ची असते. कुणाचा विठू कमलकांत, कुणाचा पद्मनाभ, कुणाचा लक्ष्मीवल्लभ तर कुणाचा कान्हडा असतो. पण बाह्य रुप वेगळं असलं तरी मूळ स्त्रोत तोच. आणि हे करताना ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं महत्वाचं की यशा मागच्या आंधळ्या हव्यासापेक्षा तो प्रवास महत्वाचा. साधन शुचिता महत्वाची. प्रयत्नान्मागचा प्रामाणिकपणा आणि कळकळ महत्वाची आणि त्यासाठी कुठल्याही क्षेत्रात असलो तरी आध्यात्मिक बैठक महत्वाची.

हे सगळं जेव्हा असतं तेव्हा राहुल, सावनी आणि जयतीर्थसारखे तप:सिद्ध सूर लागतात जे तुम्हा आम्हाला निव्वळ श्रवणभक्तीतून ईश्वरी अनुभूती देतात.  आदित्य, साई, प्रकाश, सूर्यकांत आणि आकाश सारखे हात आणि बोटं नेमकी पडून जादू घडवतात.

ज्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांनी बोलावा विठ्ठल कार्यक्रम पहिलून प्रत्यक्षात आणला त्या किशोरीताईंच्या स्मृतीस तोच कार्यक्रम वाह्यला जावा ही जीवनाच्या वारीची खरीखुरी सांगता आणि हेच त्या विठोशी एकरुप होणं.

ह्या भक्तीरसपूर्ण शास्त्रीय संगीतप्रधान अभंगवाणी कार्यक्रमातून निव्वळ मनोरंजनाव्यतिरिक्त ही आत्मोद्धाराची दृष्टी तुम्हा आम्हाला लाभो आणि पंचम निषाद प्रस्तुत बोलावा विठ्ठल असाच  अगणित लोकांच्या जीवनात प्रकाश आणो हीच सदिच्छा !

-- मनिष मोहिले

Thursday, June 22, 2017

नकळ्त

सांडलेल्या चाफ्याला मी,
नकळत वळणावर तुडवलं..
तर वेड्याने  पावलांना,
सुगंधात बुडवलं....

या चारोळीवरून सुचलेल्या ओळी

वळणावरती नकळत आली
चंपकपुष्पे पायांखाली
अंतरातील प्रीत तयांची
पाऊले गंधित करुनी गेली

दिनमणी जाता क्षितिजाखाली
वातीला तेलात भिजवली
तिज भवताली जरी काजळी
प्रकाश देते ज्योती बनूनी

हळूच ओंजळ घेता मिटूनी
रंग सोडिती फुलपाखरे ती
रंग झिरपता ओंजळीतूनी
स्वप्नरंग नजरेला देती

उभी उन्हाची देत सावली
कधी अंगावर दगडही पडती
रसदार फळांची भेट देऊनी
सोबत कायम झाडे देती

घाव टाकीचे पडता अंगी
दगडामधूनी देव प्रगटती
चुका आपुल्या घालून पोटी
भवसागरी ते तारून नेती

-- मनिष मोहिले

यावरूनच एक वेगळ्या दिशेने विचार

वळणावरती नकळत आली
चंपकपुष्पे पायांखाली
स्मरली तव पाऊले मखमली
मनी सुगंधा पेरुन गेली

नकळत मजसामोरी आले
शब्द कधी जे तू लिहीलेले
मैत्र कोवळे मनात फुलवून
अपुला मजला बनवून गेले

नकळत गेली हवा स्पर्शूनी
अंगी शहारा फुलवून गेली
हाती हात तू गुंफलास ती
आठवण ताजी मनात झाली

नकळत सर मज भिजवून गेली
अंगांगाला चुंबून गेली
पहिली मिठी तव आवेगाची
ओलेती मज पुन्हा भेटली

नकळत मजला मग आकळले
जिथे तिथे मी तुला पाहीले
शब्द, फुले, जल, समीर साक्षी
तुझ्या नी माझ्या मनोमीलनाचे

-- मनिष मोहिले 

Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपती पदाची उमेदवारी

आज भाजपा च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराचं नाव जाहीर झाल्याची बातमी सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर आहे.

टाईम्स ऑफ इंडिया येतो आमच्याकडे - त्यातही आहे. पण या बातमीच्या मथळ्यातला एक शब्द मला खटकला. आपल्या देशासाठी शाप असलेल्या जातीव्यवस्थेला तो शब्द अकारण महत्व देतोय असं वाटलं. जो शब्द वापरला तर सामान्याला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागू शकतं तोच शब्द एका मातब्बर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळक मथळ्यात वापरला जातो. संदर्भ कौतुक करण्याचा असला तरी बातम्या विकण्यासाठी तो एक महत्वाचा मुद्दा आहे हे ही तितकंच खरं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आजही सामाजिक स्तरावर जातीव्यवस्था आपल्या देशात किती समूळ रुजलीये आणि अशा बातम्या कळत नकळत त्याची जाणीव करून देतात हा चिंतेचा मुद्दा आहे.

एक व्यक्ती देशातल्या सर्वोच्च पदभारासाठी उमेदवार म्हणून विचारात घेतली जाते त्यावेळी धर्म जाती निरपेक्ष अशा संदर्भात त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणवत्तेला व कर्तबगारीला महत्व देणं हे अधिक योग्य नाही का ?

कधीतरी अशी स्थिती येइल का की भेदभाव असंच नाही पण कुठल्याच संदर्भात हे धर्म जाती बद्दलचे विचार मनात न येता एखाद्या व्यक्तीचं मूल्य निव्वळ वैयक्तिक गुणवत्तेवर केलं जाईल ?

एका व्यक्तीला प्रकाशझोतात आणून बहुसंख्याना असमान पातळीवरच ठेवायचं, त्यांच्यातील काहीना काही सवलती, गुणवत्ता असो वा नसो,  जन्माधारीत हक्क म्हणून देत त्याना त्या पांगुळगाड्याची सवय लावायची आणि देशाला पांगळं करायचं - कारण सत्तेची लालसा. ह्या सगळ्याला काही उत्तर नाही का ? ह्या जन्माधारीत सवलती आजपासून पुढे एक किंवा दोन पिढ्यांपर्यंतच मिळतील आणि त्या कालावधीत सरकारी यंत्रणा प्रामाणिक व प्रभावीपणे राबवून या जनतेचं  आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व अंगानी उत्थान केलं जाइल ज्यामुळे खरोखरच नियोजित कालावधीनंतर अशा सवलतींची गरज रहाणार नाही असं एखादं समाधान अशक्यच आहे का ?

गांधीजींच्या स्वप्नात सर्वात तळागाळातील व्यक्ती राष्ट्रपती बनू शकणार होती. वरकरणी ते स्वप्न खरं होतयसं वाटलं तरी बहुसंख्यांची स्वप्नं अंधारात गाडली जाताहेत हे विदारक सत्य आहे.

कमीत कमी वृत्तपत्रातला मथळा सुजाणपणे देण्याइतकी सामाजिक प्रगल्भता व जबाबदारीची जाणीव आपल्या समाजात व प्रसिद्धी माध्यमात येइल ?

-- मनिष मोहिले.

Monday, June 19, 2017

आशावाद

आशावाद

काल एका मित्रानी दुसऱ्या एका गृपवर एक कविता पोस्ट केली. त्याच्या दूरच्या नात्यातल्या एका वृद्ध नातेवाईकाची विकलांग अवस्था आणि त्याबाबत त्या व्यक्तीच्या जवळच्यांची वरकरणी अनास्था (वरकरणी अशासाठी की ह्या विषयाला अनेक कंगोरे असू शकतात) यामुळे त्याने एक अशा अर्थाची कविता केली की देवा, हाती पायी धडधाकट असतानाच झोपेत शांतपणे ने.

त्यावर सहज विचार आला की वृद्धावस्थेतील विकलांगता हा एक भाग झाला. पण कित्येकाना ऐन उमेदीत शारिरिक अपंगत्व येतं. तरीही त्यातील अनेकजण जिद्दीने परिस्थितीशी झुंज देत संपूर्ण जगाला प्रभावित करणारी लक्ष्य गाठताना दिसतात. अशा जिद्दी लोकांच्या मनाची घडणच निराळी आणि त्यांचं मन आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर विकलांग होऊच शकत नाही. एक जबरदस्त जिद्द आणि आशावाद त्याना कायम तरुण ठेवतो या विचारातून सुचलेलं काही

गरुडभरारी मनात असता
आकांक्षाना क्षितिज नसते
पंगु असे जरी शरीर मन पण
गगनाला ठेंगणे बनवते

खुर्चीला जरी जखडून गेला
बुद्धीने विश्वात विचरतो (Stephen Hawking)
नैराश्याची गर्ता सोडून
मैदानी युवराज तळपतो

करे पांगळी कुणी करंटा
हिंमत ना हरते अरुणिमा
नसलेल्या पायांनी चढते
काबीज करते सागरमाथा

असतील अनामिक कितीक जगती
शक्ती ज्यांच्या मनात वसते
पंगुत्वासी मात देऊनी
मन त्यांचे आयुष्य घडवते

मूर्तीमंत आशाच असे जणू
सशक्त हे मन लाभो सर्वा
शरीर जर्जर झाले तरीही
तरुण मनातील सदैव जागा

गरुडभरारी मनात असता
आकांक्षाना क्षितिज नसते
पंगु असे जरी शरीर मन पण
गगनाला ठेंगणे बनवते

-- मनिष मोहिले
१९/०६/२०१७

Wednesday, June 14, 2017

शेतकऱ्यांचं कर्जमाफी आंदोलन

गेले काही दिवस विविध राज्यातील शेतकरी आंदोलने हा सर्व प्रसार माध्यामातून चर्चिला जाणारा ज्वलंत विषय आहे.

कापूस, ऊस या सारखी काही कॅश क्रॉप्स सोडली, काही सधन शेतकरी, बागायतदार सोडले (ह्यात ही विभागानुसार अपवाद असू शकतात)  तर बऱ्याच छोट्या शेतकऱ्यांच्या पुढच्या समस्या अतिशय गंभीर - जीवनमृत्यूच्या आहेत हे ही खरं.

या समस्येचं एक समाधान म्हणून कर्जमाफीची मागणी ही मागणी आहे आंदोलनकर्त्यांची.  आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारनी ही मागणी मान्य देखील केली आहे. याच संदर्भात आता इतर राज्य सरकारांवर देखील दडपण येऊ लागले आहे.

याच संदर्भात आज पेपरमधे वाचलं की गुजरात राज्य सरकारला पण अशी कर्जमाफी द्यावी लागली तर त्यांच्यावर ७२ हजार कोटीचा बोजा पडेल. केवढी प्रचंड रक्कम आहे ही. आणि ही फक्त गुजरातची रक्कम आहे. सर्व राज्यांची मिळून कर्जमाफी रक्कम काही लाख कोटींमध्ये सहज जाइल. सरकारी तिजोरीची एवढी प्रचंड  तूट भरून कशी निघणार ? शेवटी हा सगळ्या देशाचाच पैसा आहे आणि देशाचीच समस्या आहे.

या प्रश्नावर माझा अजिबात अभ्यास नसला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की ही अशी सरसकट पूर्ण करमाफी देण्याऐवजी वेगवेगळ्या पिकांसाठी किमान आश्वस्त किंमत कशी देता येइल त्यावर काम करावं आणि शेतकऱ्यांना परतफेडीची मुदतवाढ देता येइल का  किंवा २५% / ५०% अशी माफी देऊन आणि वाढीव मुदतीत सुलभ हप्त्यात का होइना पण शेतकऱ्यांनी परतफेड करावी असे धोरण राबवता येइल का ? परतफेडीतून जमा झालेला निधी परत शेतकरी कल्याण योजनान्मध्ये वापरता येइल असा सकारात्मक विचार करता व राबवता येइल का ?

मला पूर्ण कल्पना आहे की हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेलं समस्या समाधान वाटेल, पुस्तकी किंवा अव्यवहार्य समाधान वाटेल. वरकरणी ते शेतकरी विरोधी ही वाटू शकेल. माझा या समस्येवर अभ्यास नाही हे मी आधीच नमूद केलंय. तसेच मी कोणत्याही विवक्षित राजकीय पक्षाचा वा विचारसरणीचा पाठपुरावा करणारा ह्या भूमिकेतून देखील हे लिहीत नाही.  ७२ हजार कोटी ही रक्कम वाचून आलेली ही एक प्रतिक्रिया आहे असं म्हणू हवं तर.

पण मला जो मुद्दा खटकतो आहे तो ह्यामुळे तयार होणाऱ्या मानसिकतेचा. कोणतीही गोष्ट फुकट मिळू नये. फुकट मिळणाऱ्या गोष्टींची  सवय होते. तो आपला हक्क वाटू लागतो. आपल्याकडचे मतलबी व संधीसाधू राजकारण अशा गोष्टींचा स्वार्थापुरता वापर करण्यासाठी सर्वश्रुत आहेच. असा संधीसाधूपणा करताना पीडित घटकाचाच उपयोग करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजायची, मग त्या पीडित घटकाला सोयिस्करपणे विसरून जायचं ही एक अजून मोठी समस्या आहे.

मला पूर्ण कल्पना आहे की यावर लगेच माल्या ९ हजार कोटी बुडवून गेला. त्याचं काय केलं असे प्रश्न उपस्थित होतील. पक्षपाती पणे वागावं असं मी म्हणतच नाही. खरं तर बॅंकांची NPAs हा ही एक तितकाच चिंतेचा विषय आहे.

पण जर प्रत्येक समाजघटक अशा सवलतींची अपेक्षा करू लागला तर उत्पन्न कुठून येणार हे सगळं पुरं पाडायला ? कर्ज मान्य करतानाच योग्य परीक्षण करून कर्ज देणं हे उद्योगधंद्यांच्या बाबतीत व्हायला हवं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जयोजना जाहीर करताना आत्तापर्यंतचा कर्जाचा बोजा, वाढीव बोजा, त्यासाठी उत्पन्न कुठून येणार ह्याची योग्य मांडणी हवी. ह्या योजनेची घोषणा ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी, राजकारण साधण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी असू नये.

आजच्या घडीलाही कागदावर सर्व योजना उत्कृष्ट असतील पण त्यांची परिणामकारक अंमलबजावणी देखील तितकीच महत्वाची.

या सगळ्यामध्ये शेतकरी बांधवांच्या समस्यांबद्दल शंका नाही वा त्यांच्या हितसंबनाधाना विरोधी असंही माझं मत नाही. यात शहरी ग्रामीण असा भेद किंवा सहानुभूतीचा अभाव, संवेदनाहीनता असे देखील काही नाही.  मी फक्त या समस्येची अजून एक व्यावहारिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय.

अर्धी कर्जमाफी किंवा परतफेडीच्या मुदतीत वाढ हे समाधान पूर्णपणे चुकीचंही असू शकेल.

पण एक देश म्हणून शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवताना वरील मुद्द्याचा सखोल विचार देखील  आवश्यक आहे असं मला वाटतं.

-- मनिष मोहिले

Monday, June 12, 2017

राधा कृष्ण


हे चित्र पाहून सुचलेली कविता 
राधा कृष्ण

वेणू लावते वेड जीवाला
थांब कन्हैया गोकुळी
आलिंगूनी त्या मुरलीधराला
विनवी राधा व्याकुळी

सवंगडी तव, माय यशोदा
खिल्लारे ती जरी मुकी
ऐकूनिया तव मधुर पावा
होते दुनिया नादखुळी

मिश्कील हसूनी पुसतो कान्हा
वार्ता दुनियेची कळली
म्लान तुझाही मुखडा राधा
पाणी का तरळे नयनी ?

किंचित क्रोधित हळवी राधा
गौर मुखी लाली चढली
तुज ठावी मम प्रीत मिलिंदा
जाणूनीही थट्टा करीशी ?

हळूच घे तिज मिठीत कान्हा
मधुर शब्दे समजावी
गोकुळी जरी मी नसलो राधा
छबी तुझी कायम हृदयी

ऐक सांगतो सखये तुजला
गुपीत जे ना जाणी कुणी
जरी असे मम सावळी काया
दर्पणी प्रतिमा गौर तुझी

जाणे तव नी मम प्रीतीला
राधे ही दुनिया सारी
राधेविन तो कृष्ण अधुरा
नाव तुझे माझ्या आधी

-- मनिष मोहिले 

Friday, June 9, 2017

ती आणि तो

ती आहे खूप सुंदर दिसायला. कुणीही तिच्याकडे पाहून मोहून जातो तिच्या सौंदर्यानी. लाखो करोडो तिच्यापाठी पागल आहेत.

पण तिचे डोळे कायम त्याच्याकडे लागलेले असतात. आधीच इतके महिने झालेत त्याला भेटून. इतके दिवस तो कुठे गायब आहे ते तिला कळलेलं नाही. त्यामुळे ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून आहे अगदी. बरेचदा तिला राग ही येतो त्याचा - असं काय बरं गुप्त स्वरुपाचं काम करत असेल तो ? कुठे गायब होतो महिनोनमहिने न सांगता सवरता ?  जसजसे दिवस जात असतात तस तसा तिचा "मिजाज" अजून गरम होत जातो.

अशातच कधीतरी त्याच्याकडून अवचित संदेश येतो त्याच्या मित्रमैत्रिणींकरवी. तो संदेश ती जणू अंगभर लपेटून घेते आणि मोहरून उठते. तिचं मोहोरलेलं गंधाळलेलं रुप सगळ्यांना अजूनच मोहवतं.

पण त्याचा संदेश येऊन काही दिवस उलटतात तरी त्याचा पत्ता नसतो. तिचा राग आणि आतुरता परत वाढायला लागतात.

आणि एके दिवशी अचानक तिच्या ध्यानीमनी नसताना तो तिच्या समोर येतो आणि दोघेही कडकडून एकमेकांना भेटतात. इतक्या दिवसांच्या विरहानंतर एकमेकांना भेटल्यावर किती भेटू किती नको, किती प्रेम करू किती नको असं दोघांनाही होऊन जातं.

दोघं जणू एकमेकात विलीन होतात. इतक्या दिवसांनी भेटल्याची जणू भरपाई म्हणून तो तिला प्रेमाच्या वर्षावात आकंठ बुडवतो. तिच्या अंगप्रत्यंगाला तो चुंबतो. स्वत: बेभान होत तिला पण बेभान करतो. त्याच्या प्रेमाच्या वर्षावानी ती सुखावते, तृप्त होते. तिचं सौंदर्य अजून खुलून येतं. त्याच्या प्रेमाचा अंकुर ती उदरात रुजवते. सुरूवातीचा,  बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे असलेला त्याचा धसमुसळेपणा देखील प्रेमळपणात बदलतो. त्याच्यातील माया तिला त्याच्या झिरपणाऱ्या स्पर्शातून जाणवते. काही दिवस असेच जातात. त्याच्या स्पर्शातून तिला प्रेम नी माया दोन्ही जाणवत राहतं.

पण त्याचबरोबर तिला जाणवतं की त्याची निघायची वेळ जवळ आलीये. पुन्हा एकदा तेच एकलेपण, तेच वाट पहाणं. आणि असाच एक दिवस तिला हलकेच भेटून तिच्या ओठांवर आणि कपाळावर ओठ ठेवून तो नाहीसा होतो.

पण आत्ता ती तृप्त आहे. त्याच्या प्रेमाच्या रंगीत आठवणी आहेत तिच्याकडे. त्याच्या बरोबरच्या उत्कट मीलनाचे क्षण तिच्या मनात ताजे आहेत, चिरतरूण आहेत.

या सगळ्याच्या जोरावर ती त्याची वाट पाहू शकेल आता. तो परत येइपर्यंत. भले तो असा फारच कमी काळासाठी येत असेल. पण तिला तिची स्वत:ची अशी परिपूर्ण ओळख फक्त तोच करून देऊ शकतो.

आणि म्हणूनच तिच्यापाठी जग वेडं असूनसुद्धा ती मात्र त्याची दिवाणी आहे. त्याचा सगळा लहरीपणा सांभाळून पण त्याच्या प्रेमात पागल आहे.

ती - भूमी आणि तो - पाऊस.

-- मनिष मोहिले

Wednesday, June 7, 2017

आकाशधावक

माऊंट एव्हरेस्ट (सागरमाथा) - २९०२९ फूट उंचीचं जगातील सर्वोच्च शिखर.

१७६०० फूट उंचीवरच्या बेस कॅम्प पासून २९०२९ फूट उंचीवरचं शिखर गाठायला साधारण ३३ ते ३७ तास लागतात - ते ही तुम्ही उंचावरील वातावरणाशी स्वत:ला  रुळवून घेतलं असेल तर. (If one has got acclimatized to the high altitude). शिवाय हे ३३-३७ तास हा सलग चढाई चा वेळ नाही.  प्रत्येक कॅम्प ला घेतली जाणारी विश्रांती या ३३-३७ तासात मोजली जात नाही.

पण नुकतेच म्हणजे २२ मे २०१७ रोजी
किलियन जॉर्नेट बुर्गादा या तीस वर्षीय स्पॅनिश तरुणाने एव्हरेस्ट बेस कॅम्प ते  एव्हरेस्ट शिखर ही साधारण ११४०० फुटांची चढाई विक्रमी २६ तासात केली. २० मे २०१७ ला रात्री दहा वाजता बेस कॅम्प वरून निघालेला किलियन २१ मे २०१७ च्या मध्यरात्री १२ वाजून काही मिनीटांनी शिखरावर पोहोचला. एव्हरेस्टवरील या आत्तापर्यंतच्या सर्वात वेगवान चढाईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण चढाई पुरवणी प्राणवायू शिवाय (without supplimentary bottled oxygen) आणि दोरांच्या सहाय्याशिवाय (without fixed ropes) केलेली चढाई आहे.

ही विश्वविक्रमी चढाई करणारा किलियन हा जागतिक स्कायरनिंग आणि स्की माऊंटेनीयरींग  चॅंपियन आहे. He is six time winner of Long Distance Skyrunner World series. त्याचप्रमाणे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचा देखील तो विजेता आहे.

तांत्रिक तपशीलाप्रमाणे स्काय रनिंग म्हणजे दोन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतावर धावणे जिथे चढाईचा कोन  ३०° पेक्षा जास्त आणि काठिण्य पातळी दुसऱ्या पातळी पर्यंत असतो. धावायच्या अंतराबरोबरच चढण किती खडी आहे व तिचा काठिण्यांक (degree of difficulty) यावर आधारित स्काय रनिंग मध्ये Sky, Ultra, Vertical व Extreme असे चार उपप्रकार पडतात. त्यापैकी Vertical काठिण्य पातळीपर्यंतच्या स्पर्धा किलियन ने जिंकलेल्या आहेत.

स्की माऊंटेनीअरींग म्हणजे पर्वताच्या दुर्गमतेप्रमाणे स्की पायात चढवून किंवा बरोबर वागवून पर्वतावर चढाई करणे आणि स्की चा वापर करून उतरणे.  शारिरीक क्षमतेची कसोटी पहाणाऱ्या अशा या साहसी खेळात किलियन जागतिक पातळीवर अव्वल ठरावा हे स्वाभाविकच म्हणायला हवं कारण स्पेनच्या डोंगरी भागात जन्माला आलेल्या किलियननी वयाच्या दुसऱ्या वर्षीच स्पेन व फ्रान्समध्ये पसरलेल्या पायरेनीज पर्वतश्रेणी मधील तीन हजार मीटर उंचीचा पर्वत यशस्वीरीत्या पादाक्रांत करून आपल्या अव्वल आकाशधावक बनण्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पाचव्या वर्षी या पर्वतश्रेणी मधलं अनेटो हे ३४०४ मीटर उंचीचं सर्वोच्च शिखर पादाक्रांत केलं. लहानपणीच सुरू झालेला त्याचा हा अद्भुत प्रवास आजही चालूच आहे. आजच्या तारखेला मॉं ब्लॉं (Mont Blanc), मॅटरहॉर्न, देनाली आणि आत्ता एव्हरेस्ट या चार शिखरांवरील सर्वात वेगवान चढाईचे विक्रम किलियनच्या नावावर आहेत.

आता तो एका प्रकल्पावर काम करतोय ज्याचं नाव आहे "Summits of My Life" ज्यामध्ये तो जगातील वेगवेगळ्या उच्च शिखरांवरील आपल्या चढाई व उतरण या दोन्हीचं चित्रीकरण करवून घेणार आहे.

किलियनच्या आंतरजालावरच्या चित्रफिती पाहताना त्याचा पर्वतावरील चढाईचा वेग आणि दम (stamina) पाहून आपण थक्क होतो. त्याची उतरण (descent) बघताना तर आपण अचंबितच होतो असा त्याचा वेग असतो.

इतक्या दुर्गंम जागी इतक्या लीलया व वेगानी हालचाल करण्यासाठी जबरदस्त शारिरीक क्षमता हवी हे तर दिसतच पण त्याही पेक्षा जाणवतो तो चढाई असो वा उतरण - प्रत्येक पावलामागे असलेला किलियनचा सराव, आत्मविश्वास, आणि त्या डोंगरावरचा एक अबोल विश्वास की  माझं हे पाऊल बरोबरच पडेल आणि हा डोंगरही ते सांभाळून घेइल.

अशा प्रकारचं कौशल्य इतक्या उच्चतम पातळीवर पोचायला फक्त शारीरिक क्षमता, सराव, तंत्र (technique) हे उपयोगाचं नाही तर त्याचबरोबर निसर्गाशी एक मानसिक अद्वैत असायला हवं  आणि ते अद्वैत साधायचं आणि वाढवायचं एकमेव माध्यम म्हणजे सातत्याने सराव आणि स्वत:ला स्पष्टपणे आकळलेली पण उलगडून न सांगता येण्यासारखी निसर्गाशी असलेली व झालेली समरसता.

-- मनिष मोहिले

Saturday, June 3, 2017

कृष्ण विवर - ब्लॅक होल

कृष्ण विवर - ब्लॅक होल
दोन लाख वर्षांपूर्वी एक तारा बनायला सुरूवात झाली. सहा हजार वर्षांपूर्वी तो तारा पूर्ण प्रकाशमान झाला. तेजाने तळपू लागला.

दुर्दैवाने आपण खूप तेजस्वी असल्याचा गर्व होऊन तो तारा फुगायला सुरूवात झाली आणि त्याचा राक्षसी तारा बनला. आपला वाढता आकार पाहून तो तारा मनोमन खूष होत होता पण त्याला कल्पना नव्हती की तो अल्पजीवी ठरणार होता. जे राक्षसी ताऱ्याचं होतं तेच ह्या ताऱ्याचंही झालं. तो फुटून ब्लॅक होल बनलं. या वैश्विक घटनेत एकच फरक होता - तो तारा थोडासा सुदैवी असल्यामुळे एकाच झटक्यात संपूर्ण फुटून ताबडतोब ब्लॅक होल बनलं नाही. ती एक प्रक्रिया होती आणि तो तारा ती प्रक्रिया पाहू शकत होता. ती प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि त्या ताऱ्याने प्रयत्न केला तर तो ब्लॅक होल मिटवून परत एक निरोगी तारा होऊ शकतो - अजूनही. त्या ताऱ्याचं नाव Mankind.

मानवजाती नी केलेली भौतिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक शास्त्रीय प्रगती हे त्याचं वाढतं तेज होतं. जो पर्यंत या प्रगतीमुळे  निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडला नव्हता, परस्परांबद्दलचे द्वेष, हेवेदावे, जातीभेद, वर्णभेद, सत्तालालसा, शस्त्रस्पर्धा, आतंकवाद ह्यांचा जन्म झाला नव्हता - तो पर्यंत.

पण प्रगतीच्या रस्त्यावर कुठेतरी चांगल्या गोष्टी, पर्यावरण, समतोल सारासार विचार बाजूला फेकले गेले आणि वरील अवगुणांच्या प्रचंड आकर्षणशक्तीचं ब्लॅक होल तयार झालं.

या ब्लॅक होल मध्ये सगळे चांगले गुण शोषून घेतले जाऊ लागले - परत बाहेर न येण्यासाठी किंवा अगदी क्षीण स्वरुपात बाहेर येण्यासाठी. अवगुण मात्र त्या ब्लॅक होल मध्ये न शोषले जाता फक्त त्याच्या आकर्षण शक्तीचा फायदा घेऊन चिरतरूण राहू लागले. त्यांच्यासाठी काळ गोठला. त्यांच्या समोर उभे ठाकू शकणारे सद्गुण वयानी वाढले आणि लय पावू लागले.

थियरी ऑफ रिलेटीव्हीटी सिद्ध झाली - मी माझ्या जागी बरोबर. बाकीचे त्यांच्या जागी चूक. हे असंच चालू राहीलं तर Mankind तारा पूर्णपणे ब्लॅक होल मध्ये बदलणार. पण अजूनही पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले तर हे चित्र बदललं जाऊ शकतं.

टीप -

ताऱ्याचं वय झालं की त्याचा आकार वाढत जाऊन तो राक्षसी तारा (Giant Star)  बनतो. पुढे तो फुटून प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेलं ब्लॅक होल तयार होतं. त्याचं गुरूत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की त्यात वस्तू ओढलीच जाते. त्यात काळही गोठतो. (म्हणजेच वय बदलत नाही).

सहा लाख वर्षांपूर्वी मनुष्याच्या उत्क्रांतीला सुरूवात झाली आणि आजचा मानव अस्तित्वात येऊन दोन लाख वर्ष झाली. संस्कृतीचा (civilization) जन्म सहा हजार वर्षां पूर्वीचा.

या संदर्भात पोस्ट वाचली तर आपण ब्लॅक होल मध्ये रुपांतरित होत चाललोय.
परवा पेपरला एका Stellar Black Hole बद्दल माहिती होती. Two black holes merged into each other & this stellar black hole was / is formed 3 billion light years away from us. (was / is मध्ये परत रिलेटीव्हीटी आली ). त्यावरून वरील कल्पना आली.

Black hole नष्ट होऊन परत निरोगी तारा होणे ही आशावादी कवि कल्पना आहे. प्रत्यक्षात असं होणं अशक्य आहे.

-- मनिष मोहिले