Tuesday, December 29, 2015

आयुष्याचा उत्सव

वय वाढले तसा मी;
कोवळा होत गेलो
सरणाऱ्या दिवसांनी मी;
रोजचा नवाळत गेलो

रातराणीचा सुगंध
पांघरून झोपी गेलो
श्वासात भरुनी प्राजक्त
आतून फुलत मी उठलो

पाहून फुलांचा उत्सव
चैत्र झेलण्यास मी शिकलो
पाहून वाट मेघांची
श्रावणात भिजाया शिकलो

माघारी गेल्या लाटा
परतूनी स्पर्शती धरती
सागराची पाहून प्रीती
प्रेमात पडाया शिकलो

सागरात सुख दु:खाच्या
मी नाव लोटली माझी
चिंब भिजून गेलो परि मी
नाव वल्हविण्यास शिकलो

छोट्याशा गोष्टींमधला
आनंद लुटत मी गेलो
आनंदाने कसे जगावे
मी जगता जगता शिकलो

हे शिकता शिकता सगळे
माझेच मला ना कळले
मी आयुष्याचा उत्सव
साजरा कराया शिकलो

वय वाढले तसा मी;
कोवळा होत गेलो
सरणाऱ्या दिवसांनी मी;
रोजचा नवाळत गेलो

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 22, 2015

शिल्प

हा उडे पदर वाऱ्यावर
साथीस केशसंभार
काया कमनीय अतीव
अशी रुपवती ही नार

हे उंचावलेले अधर
पहा चुंबनास आतूर
हळूच येइ मग प्रियकर
गाली प्रेमाची फुंकर

ल्याली तलमसे वस्त्र
तरीही भासे जणू निर्वस्त्र
हे रुपवतीचे शस्त्र
ना जरुरी कुठले अस्त्र

कलावंताची ही नजर
पाषाणात प्रीत पाझर
जीव दोन हे प्रेमातूर
पाषाणात सजीव साकार

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

हिमालयाची सावली

अहिल्या झाली शिळा देवत्वी राम पोचला
त्यागावे सर्वस्व परि लागले होते सीतेला

लक्ष्मणाच्या बंधुप्रेमाचा जगती झाला गवगवा
उर्मिलेच्या जीवनी भडके चौदा वर्षांचा वणवा

हरे स्वत:ला जुगारी तथाकथित तो धर्मराजा
मालकी ना स्वत:वरी तरी लावले पणी पत्नीला

बोधिसत्वाच्या तळी गवसले ज्ञान गौतमा
प्रपंचातूनी मुक्त कारण पाठराखी यशोधरा

मानसिकता नाही बदलली आज अजूनी आपुली
किती जरी कर्तृत्ववान, स्त्री हिमालयाची सावली

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

Friday, December 11, 2015

एक डाव भुलण्याचा

एक डाव भुलण्याचा
बाकी प्रत्येक सांभाळण्याचा
फरक जरी तपशिलात
दरेक संसार साच्याचा

पण खरंच असं असतं का ?
भुलून झालं एकदा की
एकमेकांना नंतर फक्त
सांभाळायचं असतं का ?

सांभाळणं म्हटलं की
आला तिथे अहंकार
देऊ साथ म्हटलं की
होतो सुंदरसा सहकार

स्वत: बरोबर जोडीदाराचं
समजून घ्यावं मी पण
बघता बघता मी अन  तू
होऊन जातात " आपण "

संसारात दरेक दिवशी
एकदा तरी भुलावं
रातराणीचा सुगंध
येतो कुठून शोधावं

आपोआप मग फुलतं नातं
मोहरून बहरतं नातं
बघून प्रत्येक डावाकडे
स्वत:लाच भुलतं नातं

------ मनिष मोहिले
@manishmohile@blogspot.com

Wednesday, December 9, 2015

चंद्र कुशीमधे मावळला

आलीस तू माळून जेव्हा
मोकळ्या केसात गजरा
मनाच्या बागेत माझ्या
धुंद पारिजात दरवळला

बोललीस का तू काही
काही ना कळले मजला
तो गोड तुझा आवाज
गुंजारव करीत राहिला

मग बंदिवान मी केले
या ओठांनी तव ओठांना
प्राशले किती जरी अमृत
मी राहीलो तहानलेला

त्या शांत चांदण्या रात्री
दाह चंदनी होइ अंगाचा
तुज मिठीत घेता वाढे
प्रेमज्वर अपुल्या गं दोघांचा

मी विरघळलो तुझ्यात
भिडवून हृदय हृदयाला
बरसवून चांदणे चंद्राने
बेधुंद केले अवनीला

तव चांदण ल्याल्या देही
देह माझा मी पांघरला
चांदणे देहभर लखलखले
आणि
चंद्र कुशीमधे मावळला

------ ------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

नशा

ईक जाम नजर से तेरे
मुझको पिला दे यारा
के बिना पिये भी मुझको
नशे में झूमने दे यारा

जी चाहता हैं चूमू मैं
तेरे होंठ रसीले यारा
अंगूरी रंग में रंग दे
मुझको इन होठोंसे यारा

जी करता हैं पी लू मैं
तेरे कातिल जोबन यारा
यह घुंबज रस से भरे जो
शराबी मिजाज कर दे यारा

यह चाल तेरी मस्तानी
नशीला कर दे माहौल यारा
अरे फिर शराब का क्या काम
जो तू साथमें मेरे यारा


------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 8, 2015

लग्नसंस्था

एका गृपवर आलेल्या एका पोस्टमध्ये मांडलेल्या काही मुद्द्यांना उत्तरे देणारा हा माझा लेख नीट समजावा म्हणून लेखाच्या शेवटी मूळ पोस्ट देत आहे.

माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणे  स्वभावत: बहुगामी असला तरी संस्कृतीचे टप्पे वर चढताना अनिश्चित बहुगामित्वापेक्षा निश्चित एकगामीत्व त्याला अधिक पटलं असावं.

सांस्कृतिक उत्क्रांती मध्ये निर्माण झालेल्या समाजरचने मध्ये एकगामित्वा मधील परस्पर सहवासामुळे निर्माण होणारे भावनिक बंध व आपुलकी आत्मियता ह्यांचे महत्व निव्वळ शारिरीक आकर्षणापेक्षा अधिक आहे हे नक्की झाले. यात परस्पर मालकी हक्काची भावना देखील महत्वाची ठरली.

यातूनच विवाहसंस्थांचा उदय झाला असावा. दोन व्यक्तींच्या संबंधाना सामाजिक मान्यता निळवून देणारी एक व्यवस्था असे स्वरूप असलेल्या विवाहसंस्थेत कालांतराने बदल होत जाऊन मूळ संबंधाना मान्यताच्या ऐवजी  या संस्थेतून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संबंध जुळवले जाऊ लागले.  मात्र यात अजून एक गोष्ट अशी साध्य झाली की उत्कृष्ट तसेच निकृष्ट सर्व दर्जाच्या स्त्री पुरूषाना एक जोडीदार मिळण्याची शाश्वतता येऊन अनाचार माजण्याची शक्यता पुष्कळ कमी झाली.

आता प्रश्न उद्भवतो तो अशा विवाहसंस्थेतून जे जोडीदार एकत्र येतात ते भावनिक, वैचारीक व अनुभूतिक पातळीवर  परस्पराना किती पूरक किंवा अनुरूप आहेत ह्याचा. (कारण सामाजिक आर्थिक धार्मिक इ अनुरूपतेची काळजी ही व्यवस्थाच घेते).

एका घरात वाढलेली भावंडं आई वडिल व मुले ह्यांच्यातही भावनिक वैचारीक अनुभूतिक पातळीवर फरक असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. मग विवाहसंस्थेकडूनच या पातळी वर  अनुरूप जोडीदार मिळेल या खात्रीची अपेक्षा का असावी ?

प्रेमविवाहामध्ये सुद्धा या अनुरूपतेची खात्री देता येत नाही कारण प्रेमिक बनून काही तास एकमेकांसोबत घालवणे आणि आयुष्याचे जोडीदार बनून राहणे यात फरक आहे.

विवाह बंधनात असताना दोन्ही बाजूनी प्रथम देण्याची नी मग घेण्याची वृत्ती ठेवली, एकमेकांच्या गुणदोषांसहित एकमेकांचा व्यक्ती म्हणून स्वीकार केला, एकमेकांचे दोष सुधारण्याच्या प्रयत्नातील प्रामाणिकपणा बघितला तर हे नातं उबदार व चिरकाळ टिकणारं होऊ शकतं.

अशा परिस्थितीतही परपुरूष अगर परस्त्री बद्दल विविध कारणांसाठी आकर्षण वाटणं शक्य आहे.ते संबंध मैत्री (शारिरीक आकर्षणाच्या जाणीवेसकट ) पर्यंत ही जाऊ शकतात.  प्रगल्भता आहे ती दोन्ही संबंधांचं एकमेवाद्वितीयपण जाणून दोन्ही नात्यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडायची. यात स्वत:शी अप्रामाणिक राहणे वगैरे काहीही नसून उलट पूर्ण जाणीवेनिशी दोन्ही नातेसंबंधाची जपणूक करणे हे महत्वाचं.

दुर्दैवानी वैवाहिक नातं प्रयत्नपूर्वक देखील निभावता येत नसेल तर वास्तविक दृष्ट्या किचकट असली तरी वेगळे होण्याची प्रक्रिया होऊ शकतेच. पण एका नात्यात एकाच नात्याशी प्रामाणिक रहावं. यात मानसिक व्यभिचाराचा भाग नसून आपल्या व जोडीदाराच्या अशा अशारिरीक गरजा ( कारण शारिरीक गरजांची पूर्तता हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे) ज्या पूर्ण करायला आपल्या शिवाय किंवा ऐवजी दुसऱ्या कोणाची गरज असू शकते हे सत्य स्विकारण्याच्या प्रगल्भतेचा भाग आहे.

या सगळ्या प्रकारात विवाहसंस्था कालबाह्य ठरवता येत नाही. आपण चर्चेला जी सुरूवात केली त्यात मनुष्य हा एक प्राणीच असून तो स्वभावत: बहुगामी आहे असं म्हटले आहे. पण मनुष्याकडे विचार व विवेक असल्यामुळे त्याची सांस्कृतिक प्रगती होऊन तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. जर एक प्राणी म्हणून बहुगामित्व समर्थनीय असेल तर प्राण्यांमध्ये प्रणयाराधन करताना फक्त एक नर व एक मादी असते. आई बहीण वडील भाऊ असे  नसते. पण ह्या नात्यातील गमन आपल्याला आपल्या सांस्कृतिक बैठकी मुळे पटत नाही. मग फक्त जोडीदाराच्या बाबतीत हे आदीम पशुत्व जागृत झालं तर त्याला विचार व विवेकाचा अंकुश का लावायचा नाही ?

 या माझ्या विचार शृंखलेत स्त्री व पुरूष हे दोघेही व्यक्ती म्हणून समान पातळीवर असणे अभिप्रेत आहे आणि त्यामुळे कालोघात पुरूषप्रधान संस्कृतीचा परिपाक म्हणून जेद असमानता आली तिचा वेगळा उहापोह केला नाही.

------ मनिष मोहिले


एक  जुनी  पोस्ट
 इथेच लिहलेली.
 त्यावर  फेसबुकवर खूप  घमासान  रणधुमाळी झाली आणि मग  मला  त्या  पोस्ट मागची  भूमिका ही  लिहावी लागली. आता सहज आठवली.

मूळ पोस्ट
°°°°°°°°°°°°°

 फेसबुकवर झालेली पुरुष सौंदर्यावरची घनघोर चर्चा .. आणि काही जणांशी / जणींशी केलेली मेसेजा - मेसेजी याचा परिपाक म्हणजे एक दोन निष्कर्ष :

माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच polygamous आहे.
लग्न ही एक अत्यंत कृत्रीम व्यवस्था आहे.
समाजात अनाचार माजू नये यासाठी काही लोकानी मानवाला चारित्र्य नीती अशा भोंगळ शब्दात करकचून आवळले आहे.
माणूस कधीच monogamous नव्हता.
त्याला तसे बनवू पाहणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंब व्यवस्था स्विकारली तरीही पुढे कधीतरी कोणी तरी आवडल्यास एकमेकांच्या सम्मतीने त्या दोन व्यक्तीस Dating करण्याची मुभा असावी .( अर्थातच या dating चे दुष्परिणाम कुटुंबावर होवू देउ नयेत. ही खबरदारी दोनही व्यक्ती घेतीलच हे गृहीतक.)
यामुळे एकूणच समाजातील / लग्न व्यवस्थेतील स्त्री-पुरुष संबंध सुधारण्यास मदत होइल.
स्त्रीला सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिल्याने लग्नाचे पुरुष तिची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतील.

वरील सर्व मते माझी एकट्याची नसली तरी मला स्वत:ला ती पटली आहेत.

आणि ही  वैचारिक भूमिका
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पोस्टमागील वैचारिक मानसिक भूमिकेचा  मी इथे आढावा घेतला आहे . आपले मत बनवण्यापूर्वी तो आपण वाचावा यासाठी तो इथे देत आहे.
आपले बरे वाईट मत आपण स्वत: बनवावे. इतरांच्या प्रभावाखाली येवून मत बनवू नये ही विनंती.

Shrirang Jadhav
तर आता पोस्टमध्ये मांडलेल्या विचारांबद्दल..
लग्न ही कृत्रीम व्यवस्था असल्याचे बहुतेक सर्वानाच मान्य आहे.
दोन अत्यंत टोकाच्या विचारांच्या व्यक्तीना एकत्र आणून त्यानी आयुष्यभर एकत्र नांदावे , ते ही सुखाने , असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे असे मला वाटते.
केवळ पुरूषच बहुगामी असतो या भोंगळ कल्पनेस पाठिंबा देउन स्त्रियांच्या आदिम आणि नैसर्गिक भावनांचा प्रवृत्तीचा आपण गळा घोटतो आहोत असेच मला वाटते. नैतिकतेच्या खोट्या आणि पुरुषी व्याख्यानी स्त्रियांच्या योनिशुचितेचे अवडंबर विनाकारणच माजवले गेले असल्याचे माझे मत आहे.
योनिशुचितेच्या हिंस्त्र आणि अमानुष समजुतीन्मुळेच सती सारख्या अत्यंत अन्यायकारक आणि पशुला देखील मान खाली घालावी लागेल अशा परंपरा व चालीरीती जन्माला घालण्यात आल्या नि पुरुषानीच त्या अति उत्साहाने पाळायला लावल्या.
जगण्याचा जीवन अनुभवण्याचा स्त्रीचा हक्क तिच्यापासून हिरावून घेण्याच्या सोवळे पाळणे विधवाना क्षौर करावयास लावणे यासारखे रिवाज हा याचाच अतिभयानक परिपाक.
मनुष्य म्हणून जगणे नाकारून केवळ एखाद्या प्राण्याप्रमाणे कोणतीही हौसमौज न करता मन मारून दिवस ढकलत राहून मरणाची वाट बघत राहणे , हे इथल्या विधवांचेच नाही तर बहुतांशी सौभाग्यवतींच्या आयुष्याचे वर्णन आहे असे मला वाटते.
पुरुषी वर्चस्वाखालील स्त्रियांच्या या परिस्थितीवर विचार केल्यास आपल्याला काय पर्याय सापडतो.. तर स्त्रियांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे , पुरूषां इतकेच मानाचे स्थान त्यानाही मिळावे , दोघानाही समान हक्क असावेत, सध्या प्रचलित असणार्या विवाह व्यवस्थेत पुरुषाइतके त्यांचे ही महत्व असावे , त्याला मिळत असणारे स्वातंत्र्य तिलाही मिळावे.
यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
विवाह संस्थेच्या अपरिहार्यते संबंधी मला शंका आहे.. तरीही तिचा स्वीकार करून विवाहीत स्त्रीला एखादा पुरुष आवडू नयेच असे म्हणणे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा शिरच्छेद करणारेच आहे.
अशा एखाद्या आवडलेल्या पुरुषासोबत
काही काळ व्यतित करावासा वाटणे यामध्ये नक्की गैर ते काय ?
माझ्या पोस्टमध्ये डेटिंग हा शब्द आलेला आहे त्याचा मला अभिप्रेत अर्थ एखादी भावोत्कट क्षणानी व्यतित केलेली रोमॅंटिक संध्याकाळ. अशी संध्याकाळ तिच्या आयुष्यात का नसावी ? आणि जर त्या दोन समविचारी अनुरूप व्यक्तीन्मध्ये सहवासाने प्रेमभावना जागृत होवून सेक्सही घडला तर खूप मोठा गहजब माजविण्याचे कारणच काय ?
बंद दारांच्या आड रोज बलात्कार सहन करण्यातच आयुष्य घालवणार्या स्त्रीला अशी तिच्या मनाजोगी सध्याकाळ मिळू नये का ?
आपली स्त्री असा हक्क मागू शकेल या केव कल्पनेनेच पुरुष भयभित होतील. पुरषी अहंकारा नुसार आपल्या स्त्रीला असा मोह होवु नये यासाठी स्वत: मध्ये सुधारणा करून घेतील अन्यथा परीणामांस तयार राहतील .. अर्थात हे स्वप्न रंजन झाले थोडेसे. हे  नजीकच्या काळात होणे शक्य नाही पण यावर चर्चा झाल्यास सकारात्मक मानसिकता तयार होवू शकेल असे वाटते....

तर ही झाली माझ्या पोस्टमागील माझी मानसिक वैचारिक पार्श्वभूमी.
©श्रीरंग जाधव.

वेगळ्या वाटा

गेल्या आठवड्यातल्या टाईम्सला एका वेलजी देसाई नामक आजपर्यंत माहीत नसलेल्या माणसाचं नाव वाचलं.

त्या वेळेस कळलं की तत्वावर चालून, जीवघेणी स्पर्धा न करता आणि अवास्तव नफ्यावर लक्ष केंद्रीत न करता माणसं यशस्वी उद्योजक बनू शकतात.

गांधीजींच्या ग्रामोद्योग व कुटीरोद्योगाला प्राधान्य द्यायच्या तत्वाची,  प्रमाणातील व मनुष्यबळावर अवलंबून माफक  यांत्रिकीकरणाशी सांगड घालून एक उद्योग उभा राहिला हे वेलजीभाईंच्या जिद्द व चिकाटीचं यश आहे.

१९८३ साली, मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या वेलजीभाईंनी नोकरी सोडली आणि Tiny Tech Plants या नावाची छोट्या यंत्रांची - जी एक / दोन माणसांनिशी सहज चालवता येतील - निर्मीती करणारा उद्योग सुरू केला.

आधुनिक औद्योगिकीकरण हे अखेरीस शोषणाकडे नेणारे असून छोट्या उद्योगधंद्याना प्राधान्य देणे गरजेचे आहे या गांधीजींच्या तत्वावर हा उद्योग चालतो. हे तत्व चूक की बरोबर हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी Tiny Tech ची गेल्या ३२-३३ वर्षातील  यशस्वी वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे.

या कारखान्यात अनेक अशी छोटी यंत्र बनवली जातात उदा - कुठल्याही तेल बियांपासून तेल काढणाऱ्या तेल गिरण्या, तेल शुद्धीकरण यंत्र, बटाटा व केळ्याचे वेफर्स बनवणारे यंत्र, आंब्याचा गर काढणारे यंत्र, ऊस पिळणारे यंत्र, गूळ बनवायचे यंत्र, सौर कुकर,  सौर ऊर्जेवरचे पाणी पंप, सौर विद्युत यंत्र व इतर बरच काही.

एका यंत्रातून मर्यादित कच्च्या मालाच्या व थोड्या मनुष्यबळाच्या मदतीने छोट्या प्रमाणावर गरजेपुरते व त्यापेक्षा थोडे अधिक जे विकून उत्पन्न मिळेल असे उत्पादन येते.

त्यांचे मुख्य उत्पादन आहे तेल गिरणीचे. Tiny Tech Oil Mill हे एक असे यंत्र आहे की ज्यात काही भाग बदलून एकच यंत्र दोन तीन वेगवेगळ्या जातीच्या बियांमधून तेल काढण्यासाठी वापरता येते - उदा. भूईमूग, खोबरेल, सूर्यफूल, एरंडेल, कपाशी, तीळ, मोहरी, जवस, व्हेजीटेबल ऑइल, पाम तेल इत्यादी. त्याचप्रमाणे हे यंत्र हा एक छोटेखानी कारखाना असून त्यात बियाणे चुरडण्यासाठीची तयारी, बिया शिजवणे, त्या चुरडून त्यातून तेल काढणे आणि ते तेल गाळून शुद्ध नैसर्गिक तेल अंतिम उत्पादन म्हणून बाहेर काढणे ही सर्व कामे होतात.
उदा २०० किलो वजनाच्या व २ हॉर्स पॉवर च्या मोटरवर चालणाऱ्या एका यंत्रातून तासाला 300 किलो भूईमूग आत टाकून तेल काढता येते ज्यात दर १०० किलो भूईमूगामागे ७२ किलो तेल मिळते. याच यंत्राला काही वेगळे भाग जोडले की एरंडेलाच्या बियांपासून तेल काढता येते.

दुसरे यंत्र जे सूर्यफूल किवा पाम तेल काढण्यासाठी वापरतात ते देखील २ हॉर्स पॉवरच्या मोटरवर चालते आणि फक्त ६५ किलो वजनाचे आहे. यात सूर्यफुलाचे बी crush करण्याआधी crack करतात ज्यामुळे तेलाचं उत्पादन जवळपास २% जास्त होते. ह्या यंत्राची क्षमता देखील ताशी  ३०० किलो ची आहे.

Renewable Energy अर्थात अक्षय ऊर्जा या प्रकारात ही कंपनी सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे पंप,  १० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मीती प्रकल्प (जे वर्षाला १८००० KWH वीजेची निर्मिती करू शकतात) , सौर कूकर, व इतर अनेक उपयुक्त उपकरणे / यंत्रे बनवते.

सोलार बास्केट जे एक प्रकारचे सौर ऊर्जा संग्राहक व परावर्तक आहेत हे एक असेच एक उपकरण जे प्रामुख्याने विविध उद्योगात वाफ निर्मिती, गरम हवा निर्मिती, वीज उत्पादन ह्यासाठी वापरले जाऊ शकते.  ह्याचे सर्वात लहान आकाराचे उपकरण ( which is completely foldable for easy
transport & can be erected easily within one hour) जे ४.५ ते ५ KW उष्णता शक्ती तासाला निर्माण करू शकते ते एक पारवलयिक (parabolic) आकाराचे बास्केट असून त्याची फ्रेम ही channel व square plate foundation base ची बनलेली असते. तिचा केंद्रबिंदू हा जमिनीलगत असतो आणि परवलयाची समांतर किंवा उभ्या अक्षाशी होणारी हालचाल केंद्रबिंदूची जागा बदलत नाही. म्हणजेच बास्केटच्या कोणत्याही अवस्थेत सौर ऊर्जेचे परावर्तन हे केंद्रबिंदूवरच होत असते.
विविध आकारात बनणाऱ्या या सौर बास्केटचा उपयोग हॉस्टेल्स हॉस्पिटल्स अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवण्यासाठी ऊर्जा निर्मिती, कपडे उद्योगातील विविध प्रक्रियांसाठी ऊर्जा निर्मिती व इतर अनेक ठिकाणी होऊ शकतो आणि बाजारातील इतर उपलब्ध सौर संग्राहकांच्या तुलनेत याला २५% च जागा लागते आणि त्याची किंमत ३०% ते ४०% इतकीच असते.

फक्त १ हॉर्सपॉवर वर चालणारा व ट्रॉलीच्या सहाय्याने सहज एकीकडून दुसरीकडे हलवता येइल असा पाण्याचा पंप हा तर छोट्या शेतकऱ्यांना मिळालेले एक वरदान म्हणता येइल. प्रत्येकी २५० watt क्षमतेची सौर पॅनेल्स व इनव्हर्टर एका दोन चाकी फ्रेमवर असतात आणि सौर पॅनेल्स समांतर तसेच उभ्या अक्षावर हलवून सूर्याच्या दिशेने केंद्रीत केली जाऊ शकतात. दोन चाकी ट्रॉली सहजपणे एका शेतातून दुसऱ्या शेतात नेता येते. Submersible पंप सहजपणे एका व्यक्तीला पाण्यात सोडता येतो किंवा बाहेर काढता येतो. हा पंप ३०० लिटर / मिनीट ह्या वेगाने पाणी उपसू शकतो.

त्याच बरोबर वात ऊर्जेच्या क्षेत्रात ह्या कंपनीचे काम आहे. पवनचक्कीवर चालणारे पाण्याचे पंप हे त्यांचं एक उत्पादन. तसेच घरगुती वापरासाठी ५०० watt पर्यंत वीज निर्मिती करणारी छोटी wind turbines चे उत्पादन देखील ही कंपनी करते.

अशा पद्धतीने छोट्या छोट्या गावातील लोकाना स्वयंरोजगारासाठी मदत होइल अशा प्रकारचे काम या कारखान्याकरवी होते.

गेल्या तेहतीस वर्षात १११ देशात या Tiny Tech ची वेगवेगळी यंत्र निर्यात झालेली आहेत ज्यात प्रामुख्याने तिसऱ्या जगातील देश असले तरी ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचेही नाव आहे.

माफक नफा तत्वावर गेली तेहतीस वर्षे या कारखान्याने उत्तम प्रतीची छोटी यंत्र बनवून स्वत:ची एक दर्जेदार यंत्रांचे कमी खर्चात  उत्पादन करणारी कंपनी म्हणून नाव कमावले आहे. या कंपनीच्या वेबसाईट वर
ग्राहकांचे त्या विषयीचे अभिप्राय आहेत.

जर एखादी गोष्ट मनात आणून जिद्दीने काम करत राहिले तर असाध्य गोष्टीदेखील साध्य होतात याचंच जणू हे उदाहरण.

नुकताच IIM रायपूर नी वेलजीभाईंचा पुरस्कार देऊन सत्कार केला तर IIM अहमदाबाद व IIM इंदोर येथे सामाजिक उद्योजकता ( Social Entrepreneurship) या विषयाच्या अभ्यासक्रमात Tiny Tech चा समावेश करण्यात आला आहे.

आज ह्या निमीत्ताने ही बातमी वर्तमानपत्रात आली म्हणून आपल्याला कळली. नाहीतर एखाद्या चित्रपटाचं गाणं , एखाद्या सिनेताऱ्याचे उद्गार, एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याचे उद्गार व त्यावरून उठणारा वादंग यातच आपण इतके गुंतले जातो की अशी वेगळी वाट चोखाळून काही समाजाभिमुख काम करणाऱ्या लोकांना मात्र अप्रसिद्धीच्या अंधारातच रहावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

या व अशा प्रकल्पाबद्दल अधिकाधिक लोकाना माहिती मिळणे व निळवून देणे ही आजची किमान गरज आहे.

------ मनिष मोहिले 

Monday, December 7, 2015

संगीत देवाघराचे

कणाकणातून या विश्वाच्या संगीत आहे झरते
जीवनावरी प्रेम जयांचे, ऐकू तयांना येते

मंजुळ किलबिल द्विजगण करती, सुरेल जणू शहनाई
नव दिवसाच्या आरंभाची दशदिशातूनी द्वाही

डोंगर खोरी झाडांमधूनी मंद वाहतो वात
प्रेमधून जणू अवनीसाठी वेणूच्या या बनात

उड्या मारूनी झरा वाहतो खळखळाट खळ खळा
पृथ्वीच्या जणू पायामधला लाडिक घुंगूरवाळा

आगमनाने वर्षा ऋतूच्या येइ मनासी  धुंदी
मेघांच्या पखवाजाशी करे विद्युल्लता जुगलबंदी

देवाघरच्या सूर ताल लयींची सुंदर ही बंदीश
कृतज्ञ होतो मनात मी; अन् झुकते माझे शीश

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

काही प्रतिक्रियात्मक लेख - पिंगा गाणं , शबरीमाला देवस्थान वादंग व राष्ट्रगीत वादंग

मला स्वत:ला पहिल्या बाजीरावाबद्दल ते अजिंक्य योद्धा होते, त्यांचे मस्तानी बरोबरचे प्रेमप्रकरण ( तिला पत्नीचा दर्जा दिला गेला होता हे मला आत्ता आत्ता येणाऱ्या WA पोस्ट्स वरुन कळलं )  आणि राऊंचा अंत अकाली रावेरखेडी येथे झाला एव्हढीच माहिती होती.

मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या " historical facts " ज्या सध्या सोशल मिडियावर पुढे येताहेत त्या तशा पुढे येण्यासाठी एका गाण्याच्या trigger ची जरूर का पडावी ?

हेच सत्यकथन आधी केलं असतं तर उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य समाजाकडून याचा विरोध केला गेला असता. आज ह्याचं स्वरूप काही अभ्यासकांच्या विरोधाला अनुसरणारा विरोध असं रुप येऊन कळत नकळत त्याची धार बोथट झालीये अथवा होणार आहे.
किती मराठी माणसाना शिवाजी महाराजांशिवायचा मराठी इतिहास माहितीये ? तुमच्या राज्यात होऊन गेलेल्या महान ऐतिहासिक व्यक्तीना तुम्ही राष्ट्रीय स्तरावर अशी ओळख का मिळवून दिली नाही की त्यांचं खरं स्वरूप इतकं सर्वज्ञात असावं की असं विपरीत स्वरुप दाखवण्याची कुणाची हिम्मतच होऊ नये.

रिचर्ड अॅटनबॅरो नी गांधी काढला आणि गांधींची जगाला माहीत असलेली प्रतिमा समोर आली. तिथे विपर्यास होण्याला जागाच नव्हती. मग गांधी सर्व गुण संपन्न होते का ? एक व्यक्ती तसेच राजकारणी म्हणून त्यांच्यातही तृटी होत्याच की. पण त्यांच्या प्रतिमेचं marketing इतकं उत्कृष्ट झालय की होणारी निर्मिती करतानाच निर्मात्याला माहिती आहे की इथे वाट्टेल ते कला स्वातंत्र्य घेता येणार नाही.

ही जाणीव आणि जागरुकता सर्व पातळीवर येणं आवश्यक आहे.
याचा अर्थ असा नाही की मी चुकीच्या इतिहासाच्या सादरीकरणाचं समर्थन करतोय. मात्र आजकालची एकंदर विचारसरणी पहाता या नकारात्मक जाहिरातीचा अधिक फायदा भन्साली ला मिळेल कारण पक्की वैचारीक बैठक नसलेले बहुतांश लोक सोशल मिडीयावरील निषेधात हो ला हो मिळवून सिनेमा बघतील ( जर चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आली नाही तर. ) .

टीपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून त्याच्यावर सिरीयल बनते आणि लोक बघतात. टीपू हा देशभक्त नव्हता. स्वत:चं राज्य टिकवण्यासाठी केलेली लढाई होती ती. पण आपल्याला कुठे फरक पडला ती सिरियल बघताना.
आपल्याला भव्य दिव्य सेट्स व आवडते कलाकार आणि करमणूक हेच महत्वाचे.

आज ह्या देशाच्या इतिहासात दोनच नावांचा उल्लेख होतो - गांधी आणि नेहरु. आता आता सरदार पटेल. या यादीत जो पर्यंत टिळक, सावरकर, राशबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, महादजी शिंदे , मल्हारराव होळकर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, पहिले माधवराव व इतर अनेकांचा उल्लेख तितक्याच आदरानी व not as a second line होणे चालू होणार नाही तो पर्यंत ह्या अप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील कलाकृतीत असं स्वातंत्र्य वारंवार घेतलं जाईल.

-------- मनिष मोहिले

शबरी माला देवस्थाना च्या वादग्रस्त निर्णयावरचं प्रिया पाटील यांचं पोस्ट वाचलं. त्यांची ती पोटतिडीक मनाला भिडली. आजच्या स्त्री स्वातंत्र्याची महती गाणाऱ्या काळात असा एखादा मुद्दा उद्भवतो की जिथे समस्त स्त्री जातीच्या मनातील संतापाला वाचा फुटावी ही परिस्थितीच समाज खऱ्या अर्थानी प्रगल्भ झालाय का हा प्रश्न सर्वांसमोर आणते. वर्षानुवर्ष घराघरातून follow होणारी एक वेगळ्या प्रकारची " अस्पृश्यता " आज चव्हाट्यावर आणली गेलीये आणि तिचं तिथून उच्चाटन करताना आपली घरातील मानसिकता बदलणं देखील अतिशय आवश्यक आहे.

आजही घराघरातून स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देव, धार्मिक कृत्य व स्थळे या पासून दूर रहातात - बालपणापासून मनावर जे संस्कार (??) बिंबवले गेले त्या मुळे. अंजली दीक्षित यांनी लिहील्याप्रमाणे आजही सणवार काळात गोळ्या घेऊन बायका पाळी पुढे ढकलतात. आज शतकानुशतके पिढ्या न पिढ्या ज्या रुढी परंपरा पाळल्या जातात - त्याबद्दल विरोधाचा शब्द न काढता त्याचा हा परिपाक.

माझे स्वत:चे विचार या बाबतीत स्पष्ट आहेत. जे आयुष्यक्रमाचा एक भाग म्हणून निसर्गानी / देवानी स्त्रीला दिलय ते घाण कसं म्हणता येइल ? त्यातूनही हे माहीत असताना की हे चक्र हे स्त्रीच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि तो मानवजातीच्या वृद्धीच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे, या मासिकधर्माच्या बाबतीत असा विचार करणं देखील नीच व शिक्षापात्र आहे.

माझ्यामते कोणतही धार्मिक अवडंबर यात माजवलं जाऊ नये. मासिक पाळीच्या वेळी धार्मिक कृत्य करावीत वा करू नयेत हा सर्वस्वी प्रत्येक स्त्रीचा स्वैच्छिक निर्णय असावा. तसं नसल्यास स्त्रियांच्या निर्णयस्वातंत्र्यावर हे एक बंधन आहे व त्यामुळे ते झुगारलच पाहीजे.

या बाबतीत स्त्री मुळात संवेदनशील असते. मासिक पाळी चालू असताना ती अधिक sensitive झालेली असते त्या शारीरिक बदलान्मुळे. अशा वेळी ही गोष्ट कोणाशी शेअर करावी वा नये हे सर्वस्वी तिच्या मनाप्रमाणे व्हावं आणि आपला समाज तर ह्याची जाहिरात करतो. आज ती जाहीर पणे केली गेली पण घराघरात मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीला धार्मिक कृत्यातून वगळलं जातं तेव्हा तिची इच्छा असो वा नसो - ती जाहिरात होतच असते.

पूर्वीच्या काळी स्त्रियाना मासिक धर्माच्या काळात विश्रांती मिळावी म्हणून हे सुरू झालं असा एक वरवर पटणारा मुद्दा पुढे आला तरी त्यात ताकाला जाऊन भांडं लपवल्यासारखं होतं. विश्रांती द्यायची तर सरळ विश्रांती म्हणून बाजूला बसवा. त्यात देव कशाला ?
आणि जरी विश्रांती म्हणून बाजूला बसवलं तरी जाहिरात व्हायची थोडीच रहाते ?
खरंच प्रगल्भता असेल तर हा निर्णय त्या त्या स्त्रीवर सोडून तिच्या निर्णयाला सादर स्विकारता यायला हवं.

पण दुर्दैवाने आपल्या समाजाचा पहिल्यापासून हा दुटप्पीपणा आहे. कुठलीही गोष्ट तर्क आणि तत्व व मूल्य यावर चांगली किंवा वाईट कशी हे पूर्णतया तार्किक तात्विक व मूल्याधिष्ठित न समजावता त्यात देव धर्म हे घुसडायचं. का ?

जेव्हा प्रत्येक घरातून या दुटप्पीपणाची उचलबांगडी होइल तेव्हा शबरीमालाचं दर्शन खऱ्या अर्थानी खुलं होइल.

------  मनिष मोहिले

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर, मग स्थळ कोणतेही असो, आपण जर नैसर्गिक विधी करण्यात बिझी नसलो तर 52 सेकंद उभे राहून राष्ट्रगीताचा योग्य मान राखण्यात काहीच प्रत्यवाय नसावा.

सध्या एक फॅशन आल्यासारखं झालंय - प्रस्थापित गोष्टींच्या विरूद्ध घडणाऱ्या घटनांचं समर्थन करून आम्ही  दोन्ही बाजूंचा साधक बाधक व समतोल विचार करतो अशी स्वत:लाच शाबासकी द्यायची.

देशानी मला काही दिलं नाही की ज्यामुळे मला आदर वाटेल म्हणणाऱ्या मंडळीनी आपण देशाला काय दिलय याचा स्वत:च्या गिरेबान में झाकके विचार करावा.

ज्या देशात तुम्ही राहता, तेथील resources वापरता त्या देशासाठी इतर कुठलंही कृतीशील योगदान करता येत नसेल तरी त्याच्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी काही सेकंद उभे रहाण्यात प्रश्न का पडावा ?

राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या जोपासनेची सुरूवात अशाच non descript गोष्टीतून होत असते.

------ मनिष मोहिले 

Thursday, December 3, 2015

ईश्क

ईश्क वह खेल नहीं, जो छोटे दिलवाले खेले
रुह तक काॅंप जाती हैं, सदमे सहते सहते

ईश्क वह बारीश नहीं, जिसमें कोई भी भीग जाये
हर साॅंस मुश्किल होती हैं,  सैलाब में बहते बहते

ईश्क सिर्फ चांदनी नही,  की ठंडक ही दे हमेशा
रोम रोम झुलसता हैं, अगन में जलते जलते

ईश्क सिर्फ मेहबूबा का आॅंचल नहीं, की ओढ ले
के सारे इर्दगिर्द होके भी, बेपनाह महसूस होता हैं

ईश्क वह जन्नत नहीं, की मिल गयी यहीं पे
इसे पाने की जुनून में कभी, दम भी तोडना पडता है

-------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, December 1, 2015

वेळ

तू सांजफुलांची वेळ
जणू रातराणी परिमळ
भारलेले सुगंधित पळ
तुला शोधण्याचाच खेळ

तू तरुण रात्रीची वेळ
अन अनुरागाचे पळ
चंदनी दाह शितळ
कासावीस चांदणवेळ

तू दवबिंदूंची वेळ
तृप्तावली देह माळ
माझ्या तनावरी दरवळ
तव रती देही परिमळ

------ मनिष मोहिले 

Sunday, November 29, 2015

तेरा इसक

जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

सुबह की लाली जैसा
तरोताजा हरियाली जैसा
आकाश की निलीमा जैसा
गुलाबी सा गुलाब जैसा
घोल दूॅं इसक के पानी में
तो यह रंग सारे दिखाता हैं
जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की खूशबू हैं

भिनी मिट्टीके सुगंध जैसी
फूलोंसे लदे बागानोसी
तेरी गीले घने जुल्फों जैसी
वादीयोंमें झूमती हवाओंसी
घोल दूॅं इन्हें मेरी साॅंसोंमें
तेरा बदन मुझमें महकता हैं
जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की खूशबू हैं

जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की आवाज हैं

पछियोंके किलबिलाहटसी
झरनोंकी झनझनाहटसी
मेघोंके पखवाजोंसी
बारीश की रिमझिम जैसी
घोल दूॅं इन्हे जहम में मेरी
लबोंपर इसकही आता हैं
जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की आवाज हैं

जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

-------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Friday, November 27, 2015

रंग जिंदगी के

थामा जो हाथ तेरा
महसूस यह हुआ हैं
के राह पर जिंदगी के
हमसफर मुझे मिला हैं

देखा जो आॅंखो में तेरी
एक उम्मीदसी जगी हैं
खूबसूरत से ख्वाब मेरी,
हसीन नींदे बना रहे हैं

सुन ली जो खिलखिलाहट
तेरे हॅंसी की मासूम
कोई सुरीली धून को
मन मेरा भी गा रहा हैं

चेहरा यह देखकर तेरा
जीने लगा हूॅं फिरसे
मुश्कीलसे जिंदगी के
रंग हाथ आ गए हैं

------ मनिष मोहिले 

सहिष्णुता

देशाच्या सीमेवरती
अर्पितात प्राण कोणी
वाफा फुका मुखीच्या
आणि दवडतात कोणी

ना हाव प्रसिद्धीची
ना संपत्तीचा मोह
अद्भुत काम करताती
नाही कुठेच नाव

हे सितारे पडद्यावरले
जन डोक्यावरती घेती
अती सुख टोचते त्यांना
मुखी बोले विपरीत बुद्धी

देशासाठी झिजती मरती
सामान्य ही माणसे किती ती
बिरुदे धर्म जातीची
त्यांच्या देशप्रेमा न नडती

ही कोल्हेकुई दांभिक
थांबवा आता तात्काळ
जर असाल प्रामाणिक
डोकवा अंतरंगात

नागरी कायदा एकसमान
यावा म्हणून करा प्रयत्न
सहिष्णुतेवर बोलण्यासाठी
लायक तेव्हाच ठराल

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Thursday, November 19, 2015

एम टी आयवा मारू

माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. नाव वाचूनच उत्सुकता निर्माण होते की नक्की काय आहे हे पुस्तक ? कशाबद्दल ?

तर एम टी आयवा मारू ही अनंत सामंत यांची एक कादंबरी आहे जी आधुनिक मराठी साहित्यातील एक विशेष उल्लेखनीय कादंबरी ठरावी - तिच्या धीट आधुनिक शैलीमुळे,  पठडी बाहेरच्या हाताळणीमुळे.

एम टी म्हणजे मोटर टॅंकर. तर ही कहाणी  आहे आयवा मारू नावाच्या बोटीची,  तिच्या सागर प्रवासाची आणि त्या प्रवासातील सागरातील वादळे आणि बोटीवरच्या प्रवाशांच्या भावनिक वादळांची.

सेकंड ऑफीसर अनंत सामंत, सेकंड इंजिनीयर दीपक उपाध्याय, चीफ ऑफीसर पॅट्रीक अॅडॅम्स, थर्ड ऑफीसर डालीझे, रेडीओ ऑफीसर चांद, कॅडेट सेनगुप्ता, त्याची आई मिसेस सेनगुप्ता, वृद्ध अनुभवी खलाशी बोसन,  अत्यंत अनुभवी तडफदार कॅप्टन रॉस, अनंतची प्रेयसी अॅना आणि मिसेस उज्ज्वला दीपक उपाध्याय - ही आहेत ती पात्र जी आयवा मारुचा हा प्रवास आणि कहाणी रंगतदार बनवतात.

आयवा मारू - हॉंगकॉंगच्या कॉर्ड्स शिपींग च्या शहात्तर शिप्सपैकी एक. ब्रेकींग यार्डला पाठवायचं नक्की झालेली ही मोडकळीला आलेली शिप परत समुद्रसफरीसाठी बाहेर काढतात कारण तिच्या मालकाला आपली ही पहिली लकी शिप परत नवीन करायची असते.

त्याचसाठी सगळा अनुभवी आणि त्यातूनही आयवा मारू वर पूर्वी कामाचा अनुभव असलेला Crew मुद्दामून गोळा केला जातो.
व्यापारी वृत्तीची कॉर्ड्स आयवा मारूला हॉंगकॉंगहून सरळ योकोहामाला नूतनीकरणासाठी न पाठवता शिंतावला व्यापारी सफरीवर पाठवते - बरीचशी डागडुजी न करताच. पण कॅप्टन रॉसला आयवा मारूच्या दर्यावर्दी असण्याबद्दल जशी खात्री असते तशीच खात्री व सार्थ आत्मविश्वास असतो स्वत:च्या अनुभवाचा व नैपुण्याचा.

सफर सुरू होते. बोटीवरील शिस्तीची दिनचर्या खेळीमेळीत अंगी भिनू लागते. सगळं काही नेहमी प्रमाणेच चालू असतं. पण सगळंच नाही.

मिसेस उज्ज्वला उपाध्याय सफरीच्या सुरूवातीपासून जहाजावर आलेली असते.
एक सरळ साधी सुंदर नवपरिणिता. तिला तिच्या नवऱ्याशिवाय - दीपक उपाध्याय शिवाय दुसरं कुणीच नसतं म्हणून ती जहाजावर येते. जिंदादिल खलाशांचं समुद्रावरचं बेदरकार बिनधास्त धाडशी आयुष्य जवळून बघायला मिळेल अशा भाबड्या विचारानी आलेली असते.

पण प्रवासात घडणाऱ्या घटना वेगळंच वळण घेतात.  खेळीमेळीचं मोकळं वातावरण संशयी बनत जातं. सरणाऱ्या दर दिवसाबरोबर गढूळत जातं; आणि प्रत्येक अशा घटनेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो उज्ज्वला उपाध्यायशी.

प्रत्येकाची वागणूक मूळ स्वभावाशी दिवसेंदिवस फारकत घेत असते. सर्वात जास्त उज्ज्वलाच्या बाबतीत.

त्यात भरीस भर म्हणून सागरावरची वादळं, मोडकळीस आलेल्या आयवा मारूला तरंगत ठेवण्याचा आणि तिला योकोहामाला नेऊन एखाद्या नववधू प्रमाणे सजवण्याचा  कॅप्टन रॉसचा आत्यंतिक आग्रह आणि कॉर्ड्सची व्यापारी वृत्ती या सगळ्या गोष्टी परिस्थिती अधिकच नाजूक बनवतात.

आणि या सगळ्याच्या मध्यभागी कथानायक अनंत. कॅप्टन रॉसचा विश्वासू, दीपकचा जीवश्च कंठश्च मित्र, अॅनाचा प्रेमी. त्याचे सतत प्रयत्न चालू असतात - सगळ्याना सांभाळण्याचे, उज्ज्वलाबद्दल त्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून स्वत:ला व स्वत:च्या मैत्रीला वाचवण्याचे. असं आकर्षण जे कधी मैत्री वाटतं, कधी जिव्हाळा, कधी ममता  तर कधी निव्वळ शारीर वासना.

शेवटी काय होतं ? आयवा मारू परत नवीन होते ? समुद्रावर उसळलेलं वादळ आणि बोटीवरील सर्वांच्या मनातील भावनिक वादळ या दोन्ही वादळांचा शेवट काय होतो?

प्रथमपुरूषी कथनातून लेखक अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने ही कथा पुढे नेतो. कथा दोस्तीची, प्रेमाची, खलाशांच्या जिंदादिलीची, प्रेमाची, वासनेची, द्वेषाची, मत्सराची, गूढतेची, धाडसाची, भावनिक आंदोलनाची, मानवी मनाच्या अनाकलनीयतेची आणि समुद्राची व खलाशांच्या जिद्दीची.

खलाशांचे मस्करीचे प्रसंग,  बोटीवरील पार्टीचे प्रसंग, अनंत उज्ज्वलामधील संभाषणे, उज्ज्वलाचा भूतकाळ कथनाचा प्रसंग, दीपकची अवघड व अनाकलनीय मानसिकता, काही कामोत्तेजक प्रसंग, अॅना व मिसेस सेनगुप्ता यांच्या बोटीवरील छोट्या भेटीचे प्रसंग , कॅप्टन रॉसच्या शिस्तीचे, अनुभवी नैपुण्याचे दर्शन घडवणारे प्रसंग, वादळाची रौद्र भीषणता, प्रत्येक प्रसंगात  घडणारं मानवी मनाचं नग्न वास्तववादी दर्शन आणि या साऱ्याचा चित्तथरारक शेवट या सगळ्या मधून लेखक एका वेगळ्या आधुनिक आणि धीट लेखनशैलीचं दर्शन घडवत आपल्याला शेवटपर्यंत बांधून ठेवतो.

आणि या सगळ्याच्या मूळाशी एक अंत:प्रवाह -

जहाज लाकडी असू दे; नाहीतर लोखंडी. दर्या जेव्हा आभाळ झोडपू लागतो तेव्हा सागराला आव्हान देणाऱ्या मानवाला दोन हातांनीच झगडावे लागते त्या बेलगाम निसर्गाशी.
एकदा किनारा सोडला की क्षितीजाच्या अतूट वलयात साथीला उरतो फक्त सागर. कधी शांत तर कधी अवखळ. कधी तळहातावर तोलून नेतो तर कधी उचलून आभाळात भिरकावतो. का? कधी? विज्ञानी गणितांत ह्याचे उत्तर कुठेच नसते. असतात बिनचूक चुकणारे आडाखे. चुकून बरोबर येणाऱ्याआडाख्यांवरून आखलेले.

निसर्गाच्या अप्रूपात हरवलेले खलाशी आजही या अज्ञाताला सामोरे जातात. बेलगाम महाभूताच्या ह्या जीवघेण्या खेळात हट्टाने सहभागी होतात. कधी काही मातीची माणसे उघड्या सागरावर स्पष्ट दिसणाऱ्या नग्न सत्यांनी दुभंगतात, हादरतात, बावरतात, निर्माण होणाऱ्या व्यामोहात भिरभिरतात. पण काही सागरपुत्र या अवखळ महाभूतांवरही मांड ठोकतात.  कोसळणाऱ्या आभळाची, उसळणाऱ्या समुद्राची तमा न बाळगता पायाखाली तरंगणाऱ्या निर्जीव पोलादाला वेठीला धरून सागराला वठणीवर आणतात. खांद्याला खांदे लाऊन उभे राहिलेले खलाशी झेपावणाऱ्या लाटेलाही थोपवणारी मानसिक निर्धाराची भिंत उभी करतात. अपुऱ्या पडणाऱ्या निर्जीव पोलादी भित्ताडालासुद्धा मानवी मनाची झिंग पाजतात. त्या तरंगत्या लोखंडी  पिंजऱ्यात स्वत:चे रक्त, मांस, जान ओतत एक प्रचंड पोलादी चेतना जिवंत करतात. कधी जिंकतात. कधी हरतात. पण परत परत लढतात. अज्ञाताच्या अंधारात चाचपडत कोसळणारे आभाळ तोलत रक्तामांसाचे खलाशी ह्या बेगुमान सागरावर आजही राज्य करतात.

मात्र जहाजाला लाडिक स्त्रीत्व बहाल करणाऱ्या शतकानुशतकांच्या पुराण्या सागरी परंपरेने रुढ केलेल्या स्पष्ट आदेशाला झुगारुन जर एखाद्या स्त्रीने जहाजावर सहप्रवासासाठी पाऊलही ठेवले तर सवतीमत्सरामुळे जहाजावर उठणाऱ्या पुढील भयंकर वादळाच्या चाहूलीने मुरलेले खलाशी आजही हादरतात.

कारण ही त्यांच्याच रक्तामांसाच्या आहुतीने जिवंत झालेली बोटीची पोलादी चेतना सवतीमत्सरानी पेटून उठून त्या स्त्रीच्या आडून उघड्या सागरावर कोणते जीवघेणे खेळ खेळेल ह्याची त्यांना शाश्वती नसते. त्या उत्पाती व्यामोहाच्या निर्माण होणाच्या कल्पनेनी ते थरकतात.

पण हे खरंच असं असतं ? आयवा मारू मिसेस उज्ज्वला उपाध्यायच्या आडून काय खेळ खेळते ? त्या खेळात शेवटी काय होतं ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचायला हवी - आयवा मारू.

-------- © मनिष मोहिले

Friday, November 13, 2015

ओढ

अशी ओढ आहे तुझी लागली
मला मी न माझा आता भेटतो

जरी दर्पणापुढे या, ऊभा मी असे
मला मी न दिसता, तुझीच प्रतिमा दिसे

सर पावसाची येता, मृद्गंध धुंद दरवळे
दरवळामध्ये त्या परि मी, तुला शोधतो

लखलखत्या तारकांनी,  हे गगन उजळले
त्या लाखोंमध्ये मजला,  तव मुखडा दिसे

मावळतीच्या किनाऱ्याचे, अद्भुत रंग ते
गगन फलकावरी, तुझेच मी गं चित्र काढतो

पहाटे थंड समीर, अंगी शहारा फुलवे
थंड समीरा परी त्या, मी तुला बिलगतो

अशी ओढ आहे तुझी लागली
मला मी न माझा आता भेटतो

---------- मनिष मोहिले

थोडासा रुमानी हो जाये

थोडासा रुमानी हो जाये -  नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट, चित्रपट माध्यमातून पडद्यावर साकारलेली एक मूर्तिमंत कविता आहे.

रुमानी म्हणजे romantic - प्रणयरम्य. चला थोडे प्रेमात पडू या , प्रणयरम्य होऊया असं सांगणारा हा चित्रपट.

१९९० साली प्रदर्शित झालेला अमोल पालेकर दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे एक सुरेख रुपक आहे.

एक छोटं गाव जिथे बरेचदा दुष्काळी परिस्थिती असते. अशा त्या गावात एक कुटुंब रहात असतं - कलेक्टर जयदीप दासगुप्ता (विक्रम गोखले), त्याचे दोन मुलगे (मोठा दिलीप कुळकर्णी)  आणि एक मुलगी बिन्नी (अनिता कंवर).

ही बिन्नी मुलगी असून सुद्धा तिच्या दिसण्यात व एकंदर व्यक्तिमत्वात स्त्री सुलभता फारच कमी असते. त्यामुळे स्वत:च्याच विश्वात ती रहात असते. वडीलांचा जरी तिला पाठींबा असला तरी एकंदरीतच घरातील सगळेच जण (आणि विशेष करून प्रेमळ पण अतिशय वास्तववादी विचार करणारा मोठा भाऊ)  तिला सतत एक मुलगी म्हणून तिनं कसं असलं पाहीजे, कसं दिसलं पाहीजे, कसं वागलं पाहीजे याबद्दल सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. सतत होणाऱ्या या भडीमारामुळे आपलं मी पण आणि लोकांना अपेक्षित रुप यातील विसंगतीमुळे बिन्नी हळूहळू रुक्ष बनत चाललेली असते. या सगळ्या ताण तणावामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक ऊजाडपणा भरुन राहीलेला असतो. अगदी तसाच रुक्ष आणि ऊजाड जसा तो पावसाविनाचा परिसर.

आणि अशा वेळी तिथे येतो नटवरलाल उर्फ धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीळकंठ धूमकेतू बारीशकर. तो येतो एक नवीन स्वप्न एक नवीन आशा घेऊन - त्या दुष्काळग्रस्त भागात पाच हजार रुपयांच्या बदल्यात पाऊस पाडण्याचे आश्वासन घेऊन.

हां मेरे दोस्त, वही बारिश,
वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है, नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है, कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है, गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है, फिर आगे निकलती है
वही बारिश

ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते हैं
उर्दू में आप, मराठी में पानी,तमिळ में कन्नी,
कन्नड़ में नीर, बंगला में… जोल केह्ते हैं
संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं ! ग्रीक में इसे aqua pura, अंग्रेजी में इसे water,  फ्रेंच में औ’,  और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं !

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है  लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है !  हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सूखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग में लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश

 इकोनॉमिक्‍स का एक सिद्धांत है कि मांग ज्‍यादा हो और आपूर्ति कम हो तो चीजें अपने आप महंगी हो जाती हैं. फिर भी इस महंगाई में बारिश सिर्फ पांच हजार रुपये में! चौंकिये मत ये कीमत हौसले की है, उम्‍मीद की है, जिस पर दुनिया कायम है...

या "sales talk" मधून सर्वाना माहीत असलेल्या पावसाचं साध्या शब्दातून एक सुरेख काव्यमय चित्र बारीशकर उभं करतो.

आत्तापर्यंतच्या निराशेनी भरलेल्या,  रुक्षपणाची, दुष्काळाची सवय झाल्याप्रमाणे असलेल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक नव्या आशेची थंड झुळूक येते - पावसाच्या आधी जशी ओलसर थंड झुळूक येते तशी आणि बऱ्याच काळानंतर सगळ्याना एक सुखद ओलावा जाणवतो.

पावसाच्या आधी पडणाऱ्या गर्मीप्रमाणेच आयुष्यात देखील अडचणी येतात पण शेवटी पाऊस येणार आहे या आशेवरच आपण ऊन्हाळा सहन करतो त्या प्रमाणे या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. आयुष्यात देखील हवाहवासा पाऊस येतोच.

बारीशकर परिस्थिती बदलत नाही, दृष्टीकोन बदलतो - आहे त्याच परिस्थितीकडे सकारात्मक व आशावादी बनून बघण्याचा दृष्टीकोन बहाल करतो.

तो म्हणतो दोन रात्रींच्या मध्ये एक दिवस नाही तर दोन दिवसांच्या मध्ये एक रात्र असते. आज आणि उद्या दोन्ही तुमचे आहेत. आयुष्यात जे हवं ते बना.

दोन किनाऱ्यांच्या मधून एक छोटीशी धारा वाहते पाण्याची. कितीही छोटी असली तरी ती वाहती असते. किनारे जागच्या जागीच असतात. वाहती धारा समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राला घाट नसतात.

एकेका संवादातून एक एक अर्थपूर्ण आशावादी कविता आपल्यासमोर उभी रहाते - कमलेश पांडेच्या चतुरस्त्र लेखणीतून.
हाच आशावाद, हाच सकारात्मक दृष्टीकोन बारीशकर बिन्नीला देतो. तिला सांगतो - जगाच्या चष्म्यातून स्वत:ला बघू नकोस. स्वत:च्य नजरेतून स्वत:कडे बघ आणि जशी आहेस तशी स्वत:ला स्वीकार. आशावादी बन. स्वप्न बघ. स्वत:वर विश्वास ठेव आणि मग बघ फरक. तुझ्या रुक्ष बनलेल्या स्व वर हा आशेचा, स्वप्नांचा, विश्वासाचा पाऊस पडून दे. भीज त्यात मनसोक्त्त. त्यातल्या थेंबांप्रमाणे थुई थुई नाचून दे तुझं मन. त्याच्या ओघोळासारखं वाहून दे स्वत:ला स्वच्छंद. त्यातल्या ओलसर गारव्याच्या  सुखद अनुभवाची कडकडून गळाभेट घे आणि मग बघ तुला जग सुंदर झालेलं दिसेल कारण तुझ्या नजरेत तू स्वत: सुंदर झाली असशील. प्रेमात पड स्वत:च्या आणि रोमॅंटीक होऊन जा. प्रणयरम्य हो आणि प्रणयाच्या कल्पनेतली रम्यता अनुभव.

असह्य उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसात चिंब भिजून ही धरती जशी स्वत:तला रुक्षपणा विसरुन मोहरते, गंधाळते, फुलून येते आणि जगाला तो मृद्गंध देते , हिरवळीनी सुखावते तशी तू जगाला मुग्धावशील कारण तू स्वत:वर प्रेम करशील.

शेवटी बारीशकरच्या प्रयत्नांना यश येतं. त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या मनात जाग्या झालेल्या आशावादाचा विजय होतो आणि तिथे पाऊस पडून ती तहानेली धरती ओलेती होते, वरुणाच्या वर्षावात चिंब भिजते आणि तिची तिला जणू नवीन ओळख होते. तशीच ओळख होते बिन्नीला स्वत:ची बारीशकर नी आणलेल्या आशेच्या पावसामुळे. ती पण आतून फुलून येते आणि स्वत:चं अंतस्थ सौंदर्य तिला दिसतं आणि त्याच बरोबर तिच्या घरच्याना. अशी ही नवी नवेली बिन्नी स्वत:च्या प्रेमात पडते आणि चित्रपट संपतो.

ही सगळी काव्यात्मकता चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर साकार करण्यात लेखक कमलेश पांडे, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि सर्वच कलाकार कमाल कमाल करतात.

विक्रम गोखले, दिलीप कुळकर्णीसहीत सर्वांचीच कामं अफलातून सुंदर आणि सहज. पण आपल्याला आठवत रहातात दोनच व्यक्ती - बारीशकर आणि बिन्नी. बारीशकरच्या भूमिकेत नानाची एंट्री उशिरा होते थोडी पण जिथे होते तिथून नाना छा जाता है. अफलातून मुद्राभिनय, संवादफेक आणि आवाजातील चढ उतारांच्या जोरावर नाना मूर्तिमंत आशावाद बनून आपल्या समोर येतो.  आयुष्यातील सकारात्मकतेवर आशावादावर श्रद्धा असलेली माणसं वेगळीच सुंदर वाटतात तसा नानाचा बारीशकर वाटतो आणि ह्याचा पुरावा देतात त्याचे " आयुष्यानी " भरलेले डोळे. Nana is simply awsome, fabulous
amazing & unbelievably believable as Barishkar.

आणि त्याच्या बारीशकरला तेव्हढ्याच ताकदीनी साथ देते अनिता कंवरची बिन्नी. सुरूवातीची स्वत:च्या कोषात स्वत:ला बंद करणारी, स्वत:चं मूळ व्यक्तिमत्व आणि जगाला अपेक्षित बिन्नी यातील विसंगती, सतत हे असं कर, तसं वागू नकोस म्हणून मिळणारा उपदेश वजा सल्ल्यांचा भडीमार यातून गोंधळून जाऊन रुक्ष बनलेली बिन्नी आणि बारीशकर आल्यानंतर सकारात्मक व आशावादी बनणारी बिन्नी हा प्रवास व त्यातील भावनिक आंदोलनं तिनी कमालीच्या ताकदीनी साकारली आहेत. अखेरीस मनाच्या रुक्ष भूमीला आशावाद, सकारात्मकता याच्या पावसात चिंब भिजून स्वत:ची नवीन ओळख झालेल्या बिन्नीला जगातलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं स्वत:तलं सौंदर्य दिसतं आणि ती स्वत:च्याच प्रेमात पडून रोमॅंटीक होते - रुमानी होते आणि चक्क सुंदर दिसते - प्रेक्षकांना सुद्धा. त्या शेवटच्या प्रसंगात अनिता कंवरच्या सर्व साधारण चेहेऱ्यातलं सौंदर्य त्या रुपेरी पडद्यामधून आपल्याला दिसतं आणि भावतं यात एक कलाकार म्हणून अनिताचं जेव्हढं कौतुक आणि कर्तृत्व आहे तेव्हढीच कमाल आहे दिग्दर्शक अमोल पालेकरची. संपूर्ण अडीच तास हा म्हटलं तर नीरस वाटणारा विषय इतक्या तरल काव्यमय पद्धतीनी हाताळायचा आणि सगळा माहौल एव्हढा रुमानी करायचा की बिन्नीचं अंतस्थ सौंदर्य सर्वांसाठी दृष्यमान व्हावं ही अमोल पालेकरच्या दिग्दर्शनाची कमाल.

चित्रपट संपता संपता एक भारावले पणा येऊन  माझे  डोळे पाणावले होते - त्याच पाण्यानी जे पावसात पण असतं -  खरच कितीही जरी अडचणी असल्या तरी  जीवन किती सुंदर आहे , आशेनी नवसर्जनानी उत्फुल्ल आहे ह्या जाणीवेतून आलेला तो पाणावलेपणा आणि मनात वाजणारं ते एक गाणं -

मुश्कील हैं जीना, उम्मीदके बिना
आओ कुछ सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये !

-------- मनिष मोहिले

Tuesday, November 10, 2015

Unstoppable

एका सत्य घटनेवर आधारित एक उत्कृष्ट थरारपट. इंग्रजीत ज्याला on the edge of your seat म्हणतात अशा प्रकारात मोडणारा.

Fuller Pennsylvania मधील एका रेल्वेयार्डात Dewey नावाच्या एका मोटरमन च्या हलगर्जीपणामुळे इंजीन नं 777 आपल्या सामान लादलेल्या बोगींसहीत बिना मोटरमन रेल्वे ट्रॅकवर चालू लागते.  यार्डमास्टर Connie Hooper च्या हे लक्षात येताच ती Dewey आणि Chief welder Ned च्या मदतीने ते  इंजीन काबूत आणण्याचा प्रयत्न करते पण पूर्ण शक्तीनिशी (on full power) धावणाऱ्या त्या इंजीनपुढे ते व्यर्थ ठरतात.  आता ही बेलगाम गाडी थांबवता आली नाही तर Stanton या तिचा शेवटचा स्टॉप असलेल्या दाट लोकसंख्येच्या शहरात जाऊन मोठा अपघात होणार आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार हे कळून येतं. कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर Connie स्थानिक पोलीस व इतर संबंधित अधिकाऱ्यांना संभाव्य धोक्याची कल्पना देते. त्याचवेळी ती आपल्या वरीष्ठाला Galvin ला देखील घडल्या प्रकाराची कल्पना देते.

सर्व गोष्टींचा आढावा घेताना हे लक्षात येते की या बिना मोटरमन चालणाऱ्या गाडीत आठ डब्यात अतिशय स्फोटक ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्यामुळे संभाव्य  धोक्याची तीव्रता कैक पटीनी वाढते. गाडी बिना लोकवस्तीच्या प्रदेशातून जात असता derail करायची कल्पना Connie Galvin पुढे मांडते. पण मालाच्या नुकसानाच्या भितीने आणि नफेखोर मालकाची हाजी करणारा Galvin गाडी थांबवण्याची एक अशक्य योजना आखतो. दोन इंजीन या गाडीच्या पुढे आणून त्यांच्या ब्रेकच्या सहाय्याने या गाडीचा वेग कमी करायचा आणि तेवढ्या वेळात सैन्यातून निवृत्त होऊन रेल्वेत काम करणाऱ्या Marine नी इंजीनचा ताबा घ्यायचा. या प्रयत्नात सर्व डब्यांसहीत पूर्ण शक्तीनिशी धावणारी गाडी त्या दोन इंजीनना उडवून लावते आणि त्यांचा अनुभवी मोटरमन मृत्यूमुखी पडतो आणि स्फोटाच्या धक्क्यानी Marine गंभीररित्या जखमी होतो. आत्तापर्यंत सर्व प्रसारमाध्यमांत ही बातमी पसरुन या घटनेला live coverage मिळालेलं असतं.
ताण तणाव वाढतात.

या सगळ्या भानगडी चालू असताना Frank Barnes हा अतिशय अनुभवी मोटरमन आणि त्याचा तरुण अननुभवी सहकारी Will Colson हे दोघे 777 च्याच लोहमार्गावर विरुद्ध दिशेनी आपली गाडी नं 1206 घेउुन येत असतात. सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असलेली Connie योग्य वेळी 1206 ला सायडींगला घेते ज्यामुळे दोन गाड्यांची टक्कर थोडक्यात टळते.

यात अनुभवी फ्रॅंक च्या लक्षात येतं की 777 च्या शेवटच्या बोगीचा कपलर ओपन आहे जिथे दुसरं इंजीन जोडलं जाऊ शकतं आणि जर तसं करुन त्या इंजीनचे ब्रेक्स अप्लाय केले तर कदाचित ७७७ ला थांबवता येइल. आणि मग ते आपल्या गाडीचं इंजीन नं 1206  सुट्टं करुन 777 ला पकडायला निघतात आणि पकडतात सुद्धा. 777 चा स्पीड थोडासा कमी करण्यात त्यांना यश येतं आणि त्यामुळेच एक अत्यंत घातकी वळण ते निर्विघ्नपणे पार करु शकतात. त्यात फ्रॅंकच्या अनुभवाचा सिंहाचा वाटा असतो.

पण 777 च्या वेगाला पूर्णतया काबू करणं त्याना जमत नाही. मग एवढा आटापिटा करुन केलेल्या मेहनतीला शेवटी यश मिळतं की अपयशच पत्करावं लागतं ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रपट पहायला हवा.

या चित्रपटाचा मुख्य नायक आहे यातला खिळवून ठेवणारा थरार आणि अतिशय घट्ट बांधून ठेवणारी पटकथा. संपूर्ण दीड तास आपण खुर्चीला खिळून पडद्यावरचे डोळे न हटवता चित्रपटात गुंगून जातो.

या पटकथेला योग्य न्याय देतात यातील अभिनेते. Frank Barnes च्या भूमिकेतला Denzel Washington, त्याचा सहकारी Will Colson बनलेला Chris Pine, Rossario Dawson ची Connie Hooper - प्रमुख भूमिका निभावणाऱ्या या तीनही कलाकारांची कामं लाजवाब.  एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळताना अनेक निर्णय चटचट घेणारी Connie, Rossario Dawson नी अफलातून साकारलीये.  Chris Pine चा वैयक्तिक कौटुंबिक अडचणीत अडकलेला पण धाडशी व कर्तव्यदक्ष Will Colson पण अप्रतिम. आणि Frank Barnes च्या भूमिकेत Denzel Washington निव्वळ लाजवाब. स्वत:च्या कामातील नैपुण्य, अनुभव आणि त्यामुळे आलेला आत्मविश्वास, जीवनाबद्दलचा त्याचा अनुभव आणि एवढ्या कठीण प्रसंगात डोकं शांत ठेउन योग्य निर्णय घेणारा व ते अंमलात आणणारा फ्रॅंक बार्न्स, डेंझेल वॉशिंटननी पडद्यावर जिवंत केलाय. इतर सहाय्यक अभिनेत्यांची कामे देखील सुरेख.

थरारपटामध्ये अत्यंत महत्वाचे असलेले छायाचित्रण व ध्वनीमुद्रण आणि ध्वनी संयोजन व परिणाम उत्कृष्ट. Casting थोडक्यात कलाकार निवड अगदी अचूक.

आणि दिग्दर्शक Tony Scott चं दिग्दर्शन. चित्रपटातील थरार कायम ठेवताना, त्याच्या वेगात अडथळा येउन न देता, समांतर पातळीवर स्कॉट आपल्याला दर्शन घडवतो Will Colson च्या पत्नीबरोबरच्या भावनिक घालमेलीचं, पत्नीच्या मृत्यूनंतर आपल्या दोन तरुण मुलीन्मधेच जग सामावलेला आणि रेल्वे कंपनीच्या धोरणांमुळे मुदतपूर्व निवृत्ती लादला गेलेल्या फ्रॅंकच्या मनातील आंदोलने, एखादी घटना घडत असता जनतेला, प्रसारमाध्यमाना त्या नाट्यातील मंचावरचे कलाकार दिसतात फ्रॅंक व विल सारखे. पण पडद्यामागे कोनी सारखं कोणीतरी अथक प्रयत्न व तेही अनेक आघाड्यांवर काम करत असतं - या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकानी फार उत्कृष्ट पणे दाखवल्यायत. ( आपल्या कडचं असं एक उदाहरण म्हणजे A Wednesday मधल्या कमिश्नर अनुपम खेरचे दाखवलेले प्रयत्न).  हे सगळं करताना टोनी स्कॉट सतत आपली उत्कंठा वाढवत रहातो त्याच्या हाताळणीतून.

A perfect mixture of on the edge of your seat kind of thrill, drama, behind the scene activities &  family emotions. Its an amazing cinematic experience - this movie.
एक असा चित्रपट जो आधी बहितला असल्यामुळे शेवट माहीत असला तरी त्याच्या उत्कंठा वाढवणाऱ्या हाताळणीमुळे जिथून बघायला सुरू करु तिथून शेवटपर्यंत बसायला लावणारा.

Once the movie starts rolling in front of your eyes, no matter from where you start watching, this movie itself is simply  "Unstoppable" .

------ मनिष मोहिले 

Friday, November 6, 2015

दोष

माझ्या खुळ्या दिलाचा काहीच दोष नव्हता
हसलीस मुग्ध तू नी, दिलाचा बोलबाला

तू चांदणफुली जणू गं, रातराणी गंधमदनिका
शोधात सुंगंधाच्या, मज झाली चांदणबाधा

केस तुझे कुरळे गं, सळसळले नागीणीसम ते
गंधित विळख्यात धुंद, मन बेहोष झाले माझे

तव नेत्र भावभरले, जणू डोह खोल प्रीतीचा
अन थांग लावताना, मी चिंब चिंब भिजलेला

तुझ्या मेहंदीचा गं रंग सुगंधानी रंगलेला
माझ्या तळव्यामध्ये ग तुझा मुखडा हसला

-------- मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Friday, October 30, 2015

प्रेमात


हसतेस गोड गालात
भुलतो मी खोल खळीत

पुसतेस ओलेते केस
मोहरतो मी शहाऱ्यात

गजरा माळतेस केसात
बहरतो मी मोगऱ्यात

हा नजरेचा कुठला खेळ
हरवतो मी तव नयनात

त्या गोड तुझ्या गीतात
मी सुरेलसा गंधार

कसे सांगू तव हे गुपित
मी आकंठ तुझ्या प्रेमात

------ मनिष मोहिले 

Tuesday, October 27, 2015

पुनवेच्या रातीला


चांदणे बहरून येई
पुनवेच्या रातीला
गंधाळते रातराणी
चांदण्याच्या साथीला

यौवन हे अवनीचे
धवलनील स्पर्शण्या
आतुर शशी होतसे
स्वर्गीय अशा मीलना

प्रणयधुंद आसमंती
प्रीत होइ बेभान
फुलवते काटा तनी
तव अधरांचे चुंबन

तुझ्या मिठीत चांदणी
घे मजसी ओढून
माझ्यातील रातराणी
मोहरे अशी बहरून

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Saturday, October 24, 2015

तुझा नी माझा गंध असावा


तुझा नी माझा गंध असावा
असा सुवासिक छंद असावा

अंगणामध्ये तुझ्या नी माझ्या
प्राजक्ती विश्वास फुलावा
शुभ्र प्रीतीचा सडा मोगरा
तन मनी आपुल्या बहरत जावा
तुझा नी माझा गंध असावा
असा सुवासिक छंद असावा

शुभ्र सुगंधी नात्यामध्ये
मंद धुंद निशिगंध रुजावा
काट्यांशिवाय दु:खांच्या अन्
ताटवा गुलाबी सुखवत जावा
तुझा नी माझा गंध असावा
असा सुवासिक छंद असावा

बागे मध्ये प्रीती तृप्तीच्या
अनुरागाचा राग गुंजावा
लेऊन लेणे पुष्पसुगंधी
रागिणीस नव छंद मिळावा
तुझा नी माझा गंध असावा
असा सुवासिक छंद असावा

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

चिऊताई

घरातल्या माळ्यावरच्या
घरट्यातल्या  चिऊताईशी
बालपणासून सलगी होती
झाली अजि परि दिसेनाशी

काड्या तुटल्या सुटले घरटे
पाणी संपले वाटीमधले
माळा झाला मोकळा आणि
मुके मुके घर उदासवाणे

आज परतूनी ईच्छा होई
चिव चिव पुन्हा कानी पडावी
घरामधल्या चिऊताईला (मुलगी)
एक सखी घरट्यात मिळावी

सांभाळायचे घर नी घरटे
करणे असे अन् संगोपन ते
गरुड भरारी रक्तात भिनावी
आभाळही मग ठेंगणे पडावे

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Thursday, October 22, 2015

निरंतर


तुझ्या नी माझ्या नात्यामधली
अवीट गोडी उरो निरंतर

नजरभेट ही झाली अपुली
क्षणात मिटले मनात अंतर
तुझ्या नी माझ्या नात्यामधली
अवीट गोडी उरो निरंतर

आयुष्याच्या सारीपाटावर
खेळ रंगवे अपुले मैतर
तुझ्या नी माझ्या नात्यामधली
अवीट गोडी उरो निरंतर

हात तुझा हा साथ देतसे
आयुष्याच्या वेळी कातर
तुझ्या नी माझ्या नात्यामधली
अवीट गोडी उरो निरंतर

साथ अशी ही राहो सुमधुर
आठवणींचे दरवळो अत्तर
तुझ्या नी माझ्या नात्यामधली
अवीट गोडी उरो निरंतर

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Tuesday, October 20, 2015

पुरवाई


पुरवाईका झोका आया
बीते दिनोंकी गलियोंसे
नजरोंसे जो दूर हुवे हैं
मिलवाया उन अपनोंसे

खेल दोस्त वह बचपन के
और शरारतें बचपनकी
ऊनके साथ लाई पुरवाई
मासूम हँसी वह बचपनकी

जवानी का वह रंगीलापन
और गहराई इशका दी
एक अजीब उदासी छाई
सुरमईसे ऊन शामोंसी

एक सुकूँसा फिरभी दिलमें
जो कहता हैं पुरवाईसे
शुक्रगुजार रहूँगा तेरा
मिलवाया जो अपने आपसे

-------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

रातीचा आठव


हे यौवन तुझे अनावर
सावरू कसे ना कळले
जणू बहरला पारिजात
सुगंधानी बेभान केले

ते बोल तुझ्या गे मुखीचे
हळूवार लाजले होते
माझ्या देहावर फुलसडे
ऐकताना झाले होते

अशी कोसळलीस सखे तू
मीलनास आतुरलेली
माझा श्रांत श्वास शांतवे
तुज धपापणाऱ्या वक्षी

प्रात:काली मंद समीर
अन् पानांवरले दव
तृप्ततेने मिटती नयन
येता रातीचा आठव

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Sunday, October 18, 2015

जुने नाते अजूनी रेशमी आहे


जुने नाते सखे अपुले गं 
अजूनही रेशमी आहे !! धृ !!

केसातला तुझ्या गं 
सुकला सखे जरी गजरा 
सुगंधी दरवळ त्याचा
बकुळ ताजा अजूनी आहे !! १ !!

आवाज सखे जरी माझा 
आहे थकलेला थोडा 
ते सूर प्रीतीचे अपुल्या 
मी पंचमात गात आहे !! २ !!

जरी झाला थोडा हळवा 
जुना अवखळ तो पाऊस 
तुझ्या स्पर्शाची सय ओली 
शहारा अजूनी फुलवते आहे !! ३ !!

त्या ओल्या पुळणीवरती 
फुलते शांत चांदणे अजूनी
चांदण पाऊले ऊमटविताना 
आयुष्य अजूनही बोलते आहे !! ४ !!

जुने नाते सखे अपुले गं 
अजूनही रेशमी आहे !! धृ !!

------  © मनिष मोहिले 
@manishmohile.blogspot.com

तू सखे पण

फुलविल्यास बागा सुगंधी,
फुलवेड्या तू सखे पण
एकली ही वाट माझी,
भरली काट्यांनीच होती

लक्ष लक्ष ऊजळून दीप,
आरास केलीस तू सखे पण
माझ्या प्रवासात कायम,
सोबती अंधार होता

आळवून प्रीतीचे गीत,
जिंकलीस मैफील तू सखे पण
ऐकणे माझ्या नशिबी,
कायम विराणीच होती

कथिलीस तुझी गे ही कहाणी,
या जगाला तू सखे पण
श्रोत्यांविना कविता ही माझी
माझ्या मनी विझूनीच गेली

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

वाट


ही वाट धुक्याची धुंद
वाहतो समीर स्वच्छंद
भवती हिरवाई गर्द
दरवळतो रान सुगंध

वळणावळणांची वाट
एका वळणावर भेट
घेऊन हात हातात
चालणे पुढील ती वाट

त्या वळणांवरती दिसती
विहंगम दृष्ये काही
हिरवीगार खोल कुठे दरी
कुठे अनवट गिरीशिखरे ती

कधी कवडसा ऊन्हाचा एक
जणू चैतन्याचा झोत
मेघ अंबरी कधी एक
एकला म्हणूनी तो खिन्न

कधी पावसाची ये सर
अल्लड अवखळ नी खट्याळ
कधी सरळ संततधार
दु:खाचा एकसरी पाझर

अनुभव हे सारे विविध
करतात जीवन समृद्ध
तो अनुभव जगण्या साथ
देइ हातातील तव हात

--्---्- मनिष मोहिले 

स्वप्नांची दुनिया


स्वप्नांच्या या दुनियेमध्ये
स्वप्नांच्या वाटेने जावे
स्वप्नातील सोनेरी क्षण ते
पूर्ण आयुष्य क्षणात जगावे

स्वप्नातील सोनेरी क्षण ते
आनंदाचे रंग ऊधळती
भावमेघ ते मऊ सावरी
कमान त्यावर सतरंगांची

भावमेघ ते मऊ सावरी
हलके हलके विखरून जाती
स्वप्नातही मग ईच्छा होई
जमविण्यास तो मोद सावरी

स्वप्नातही मग ईच्छा होई
जागृती ही आनंदी असावी
प्रमुदित जागृती मधूनी पुनश्च
स्वप्न दुनियेची वाट मिळावी

--्---्-  मनिष मोहिले 

Saturday, October 10, 2015

महानायक

शतकाचा तारा ! महानायक ! - अमिताभ बच्चन. सुपरस्टार या पदाचं परिमाण बदलणारा रुपेरी पडद्यावरचा तारा. एक समर्थ अभिनेता.

"सुपरस्टार" म्हणजे काय हे हिंदी चित्रपटसृष्टीला कळायला लागल्यापासूनचा दुसरा "सुपरस्टार". पहिला राजेश खन्ना - पण त्याच्या सुपरस्टार पदाचा कालावधी त्यामानानी लहान होता. अमिताभ मात्र बराच काळ त्या पदावर विराजमान होता. त्याचप्रमाणे महानायक पदाच्या वलयाला साजेशी व्यावसायिकता  दाखवणारा पहिला अभिनेता.

कलकत्त्याची नोकरी सोडून हिंदी चित्रपट सृष्टीत नशीब अजमावायला आलेल्या अमिताभचे पहिले तेरा चित्रपट बॉक्स ऑफीसवर साफ आपटले आणि नंतर सलीम जावेदची कथा असलेल्या प्रकाश मेहराच्या  "जंजीर" नी हिंदी चित्रपटाच्या नायकाला "Angry Young Man"चे रुप दिले आणि अमिताभ ला त्याच्या कारकिर्दीचं पहिलं यश. इथून पुढे त्याच्या कर्तृत्वाचा वारू भरधाव धावू लागला तो आजही धावतोच आहे.

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अमिताभ ने अतिशय व्यापारी करमणूकप्रधान मिस्टर नटवरलाल, लावारीस, दोस्ताना, मर्द, कुली, हम, शहेनशाह सारखे चित्रपट दिले. अमर अकबर अँथनी, नसीब, अंधा कानून सारख्या मल्टीस्टारर चित्रपटातून देखील आपल्या अभिनयाची चमक दाखवली आणि त्याचबरोबर दीवार, त्रिशूल, नमक हराम, आनंद, नमक हलाल, काला पत्थर, बेमिसाल, सिलसिला, शक्ती, अग्नीपथ, मैं आझाद हूँ अशा  उत्तमोत्तम चित्रपटातून  राजेश खन्ना, दिलीप साब, संजीवकुमार या सारख्या अभिनयातील दिग्गजांसमोर तेव्हढ्याच ताकदीनी उभा ठाकला आणि नुसताच उभा ठाकला नाही तर स्वत:चा ठसा त्यानी त्या चित्रपटात सोडला. स्वत:ला लाभलेलं "स्टार" वलय आणि निसर्गदत्त अभिनय यांचा सुंदर मिलाफ साधला.  त्या शिवाय वयाच्या दाखल्यात "म्हातारा" गणला जायला लागल्या नंतरचे पा, बाघबान इ. मधून सुद्धा तो आजच्या पिढीच्या सुपरस्टार्स च्या चित्रपटांसमोर समर्थपणे उभा राहिला.

कारकिर्दीच्या सुरूवातीला ऊंची व आवाज (ऑल इंडिया रेडीओ ने अमिताभ चा आवाज आकाशवाणी साठी योग्य नाही म्हणून त्याला नोकरी नाकारली होती म्हणे. AIR चे शतश: आभार कारण त्यामुळे आपल्याला अमिताभ मिळाला) या दोन 'नकारात्मक' गोष्टी अमिताभला आडव्या येत होत्या. हे त्याचं असामान्य कर्तृत्व की नंतर नायकपदासाठी चांगली ऊंची हा एक मापदंड बनला.

आवाजाच्या बाबतीत मात्र त्याच्या त्या देवदत्त 'खर्जा' समोर फार कोणी टिकणं कठीणच. मात्र फक्त त्या नैसर्गिक आवाजावरच तो थांबला नाही. ज्या भाषेत बोलायचं, संवादफेक करायची त्या भाषेचा बाज सांभाळणे, अतिशय शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार, लिखित शुद्धलेखना प्रमाणे बोलीचे नियम पाळणे आणि आवाजातले चढ उतार ह्या त्यानी प्रयत्नपूर्वक कमावलेल्या गोष्टी. म्हणूनच त्या त्या भूमिकेप्रमाणे योग्य संवादफेक त्याला जमायची. लांबलचक एकपात्रीप्रमाणे वाटणारे संवाद जमायचे. या लांबलचक संवादांची व त्यातील आवाजाच्या चढ उतारांची दोन तीनच उदाहरणं देतो - दीवार मधला सुप्रसिद्ध देवळातला संवाद, लावारिसमधला रात्रीच्या वेळी अमजद खानच्या कोठी समोर केलेला प्रसंग आणि अंधा कानून मधला कोर्टरूम ड्रामा चा प्रसंग. ह्यातल्या प्रत्येक प्रसंगातले आवाजाचे चढ उतार (voice modulations) पहा. केवळ लाजवाब.

याच आवाजाच्या आणि आवाजावरील हुकूमतीच्या जोरावर त्याने देवाबरोबर भांडणे केली (दीवार), प्रेयसी साठी कविता म्हटल्या (कभी कभी, सिलसिला), विनोद करून आपल्याला हसवलं ( चुपके चुपके, सत्ते पे सत्ता - दारू पिनेसे लीव्हर खराब होता हैं, Amar Akbar Anthony  - दारू पिऊन मार खाल्ल्यावर आरशातल्या प्रतिबिंबाला मलमपट्टी करण्याचा प्रसंग, नमक हलाल मधली क्रिकेट कॉमेंट्री), आपल्याला रडवलं (दीवार, शोले, शक्ती यातील मृत्यूचे प्रसंग) आणि खलनायकासमोर संवादांची आतिषबाजी केली आणि त्यांची धुलाई पण केली.

अभिनयाबद्दल बोलायचं तर चेहे-या वरचे भावप्रदर्शन वादातीत. रेश्मा और शेरा एरवी अनुल्लेखीत चित्रपट पण  - मुक्याची भूमिका करणा-या अमिताभसाठी पहावा. वर उल्लेख केलेल्या आनंद, दीवार, त्रिशूल, काला पत्थर, बेमिसाल, सिलसिला, शक्ती, मैं आझाद हूँ या प्रत्येक चित्रपटातील त्याचे चेहे-यावरचे भाव प्रदर्शन निव्वळ अफाट.अभिमानमधील प्रथितयश गायक, प्रेमी, लग्नानंतर स्वत:च्या गायनाच्या क्षेत्रात स्वत:च्या बायकोलाच प्रतिस्पर्धी म्हणून पुढे जाताना पाहून मत्सरग्रस्त होणारा नवरा आणि शेवटी पश्चात्तापदग्ध होऊन तिच्याशी मीलन करणारा प्रेमळ पती ह्या सगळ्या प्रवासात त्याची face expressions लाजवाब.

आणि देहबोली. त्या बद्दल तर विचारूच नका. दीवार मधला तोंडातली विडी इकडून तिकडे फिरवणारा निर्विकार थंडपणा,  काला पत्थर मधली सुरूवातीलाच एका खाणकामगाराची दिवसभराच्या कष्टाच्या थकव्याची चाल,  सत्ते पे सत्ता मधल्या "बाबू" च्या डोळ्यातील खुनशी थंडपणा, मैं आझाद हूँ मधला तो शेतक-यांच्या आभारप्रदर्शनाचा प्रसंग,  आत्ता आत्ताच्या पिकू मधला बद्धकोष्टानी विचार ग्रासून गेलेला म्हातारा. आनंदमध्ये तर तो निव्वळ डोळ्यांनी अन चेहे-यातून बोललाय असं म्हणण्याइतके कमी संवाद आहेत. बेमिसाल मध्ये शेवटी अरुणा ईराणीला तिने विनोद मेहरा विरुद्ध तोंड ऊघडू नये म्हणून तिला हवेच्या बुडबुड्याच्या इंजेक्शनची धमकी देतानाचा त्याचा तो आगळाच थंडपणा, आखरी रास्तामधला बायकोवरच्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी स्वत:च्या इन्स्पेक्टर पोराच्या विरुद्ध ऊभा ठाकलेला बाप आणि तो इन्स्पेक्टर  मुलगा यांच्यातले समोरासमोरचे प्रसंग. नवीनपैकी विरुद्ध मधला त्याचा तरुण मुलाच्या अकाली मृत्यूने खचलेला आणि शेवटी अपराध्याला स्वत:च सजा द्यायला निघालेला बाप अथपासून इतिपर्यंत पटतो.

त्याची अजून एक खासियत म्हणजे तो जशी भूमिका असेल तसा वाटू शकतो. तो टपोरी ही वाटू शकतो (दीवार, कुली, लावारिस) खानदानी श्रीमंतही वाटू शकतो (नमक हराम, शराबी, डॉन - यात तो खानदानी नसून स्मगलर असला तरी श्रीमंतीचं खेळणारं पाणी सहज दाखवतो), एक मध्यम वर्गीय (चुपके चुपके, आनंद)  देखील वाटू शकतो, तो मजूर ही वाटू शकतो आणि मालक देखील वाटू शकतो.

मग एव्हढी अभिनय क्षमता असताना, आवाजावर, संवादफेकी वर प्रभुत्व असताना, इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून सुद्धा त्याच्या समकालीन किंवा मागाहून आलेल्या कलाकारांची अधिक वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अशी जास्ती प्रसिद्धी का झाली ?

प्रेक्षकांच्या मनातील, प्रत्यक्ष आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दलच्या असंतोषाला आपल्या "Angry Young Man " च्या  रुपातून रुपेरी पडद्यावर वाचा अमिताभ नी फोडली.
प्रस्थापित अन्यायकारी घटकांविरुद्धचा त्वेष हिंदी चित्रपट सृष्टीतील मारामा-यांच्या प्रसंगात खराखुरा भासेपर्यंत ओतण्याचं काम अमिताभनी केलं आणि त्यामुळे त्याचं ते रुप सर्वात जास्त पसंत केलं गेलं.
त्यामुळे जास्तीत जास्त दिग्दर्शकांनी अमिताभला तशाच भूमिका देणं पसंत केलं. नवनवीन विषय हाताळणारे दिग्दर्शक, लेखक आत्ता आत्ता आले. त्यातून अमिताभ हा दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे चालणारा अभिनेता (director's actor) त्याच्याच म्हणण्या प्रमाणे. पण  तद्दन व्यापारी चित्रपटांना (शक्तीशाली कथा पटकथा याशिवाय)  स्वत:च्या नावावर यशस्वी करण्याइतकी धमक, कुवत व स्टार व्हॅल्यू फक्त अमिताभ बच्चन या एकाच अभिनेत्याकडे होती हे ही तितकंच निर्विवाद सत्य होतं. आणि म्हणूनच स्वत:च्या नावावर थिएटर्स  हाऊसफुल्ल केली कित्येक वर्षं त्यानं.

कुली च्या वेळच्या त्या जीवघेण्या अपघातातून तो वाचावा म्हणून नवस करणारे, उपास करणारे असे लाखो करोडो चाहते त्याला लाभले. क्वचितच एखाद्या कलाकाराला इतकं प्रेम लाभतं लोकांकडून.

इतकं असून तो राजकाराणात का गेला ? एका  वेगळ्या जातीची लोकप्रियता अनुभवायची म्हणून की सत्ता हवी हवीशी वाटली म्हणून ? पण ते तितकसं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की राजकारण हा आपला प्रांत नव्हे हे ओळखून तो परत त्या कडे वळला ज्यासाठी त्याचा जन्म झालाय - अभिनय.

त्यानंतर हिंदी चित्रपट क्षेत्रातील चित्रपट निर्मितीचा पहिला corporatisation चा प्रयत्न त्याने केला आणि जरी अमिताभ त्यात यशस्वी झाला नाही तरी एक नवीन मार्ग त्याने दाखवून दिला हे निश्चित.

या फसलेल्या उद्योगाने त्याला कर्जबाजारी केलं. अमिताभ संपला असं ब-याच जणांना वाटलं. पण राखेतून पुन्हा जिवंत होणा-या फीनिक्स पक्ष्याप्रमाणे तो परतून आला and he came back not with a whimper but with a bang -  कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून लहान पडद्यावर देखील त्यानं आपलं अधिराज्य पहाता पहाता प्रस्थापित केलं. एक सर्वात यशस्वी कार्यक्रम संचालक म्हणून तो घरा घरात जाऊन पोचला. घरातलाच एक सदस्य बनला.  त्याच्या विविध वयाच्या , विविध क्षेत्रातून आलेल्या स्पर्धकांबरोबरची वागाणूक, त्यांच्या बरोबर "connect" करण्याची हातोटी आणि एकूणच वागणूकीतलं सौजन्य व अदब यांनी त्याच्या बद्दल एक वेगळीच आपुलकी व आदरभाव लोकांच्या मनात उत्पन्न झाला.

अर्थात या सगळ्यामागे त्याचं अतिशय व्यावसायिक वागणं हा एक मुख्य घटक होता. तीच व्यावसायिकता जी सुपरस्टार असून सुद्धा त्यानी कधीही सोडली नाही - वक्तशीरपणा, शेड्यूलमध्ये काम पूर्ण करण्याची धडपड ( इंद्रजीत या चित्रपटाच्या climax च्या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याला अपचन व ताप असं असताना देखील हॅलिकॉप्टर आणि अनेक कलाकार असलेल्या त्या प्रसंगाचं चित्रीकरण त्यानं पूर्ण केलं कारण निर्मात्याचे पैसे वाया जाऊ नयेत), "शॉट" परफेक्ट व्हावा म्हणून त्याची मेहनत - या सर्व त्याची स्तुती करणा-या गोष्टी त्याच्या बरोबर काम करणा-या दिग्दर्शक, सहकलाकार यांनी सांगितलेल्या आपण ऐकल्यायत.

आज एका वेगळ्याच ऊंचीवर तो ऊभा आहे जे यशापयशांच्या परिणामांच्या पलीकडे आहे. या वयातही (अनेक विकार असूनही) तो  तब्येत व्यवस्थित राखून आहे.

त्याची तब्येत अशीच धडधाकट राहो आणि अजून काही वर्ष "अमिताभ बच्चन" हा सात अक्षरी चमत्कार आपणा सर्वांना पहायला व ऐकायला मिळो हीच त्याच्या वाढदिवशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.

--------  © मनिष मोहिले 

Thursday, October 8, 2015

वाटेवर सप्तपदीच्या

" वाटेवर सप्तपदीच्या "


वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
ऊलटली तुझ्यावरी दुनिया, होऊन तुझी राहीन

वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
शिशिरातही तुझिया जीवनी, ऋतू वसंत मी फुलवीन

वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
अंगणी मोकळ्या तुझिया, मी  पारिजात फुलवीन

वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
स्वप्नांना तुझिया, माझ्या; विश्वासाचे पंख देईन

वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
निराशेच्या सायंकाळी,  मी सांजवात लावीन

वाटेवर सप्तपदीच्या मी साथ तुला देईन
नक्षत्रफुलांनी तुझी मी, हर एक रात्र ऊजळीन

दो समान व्यक्ती म्हणूनी, ही वाट जाऊ चालून
वाटेवर सप्तपदीच्या, एकमेकां साथ देऊन

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Wednesday, October 7, 2015

माझा स्वभाव नाही

" माझा स्वभाव नाही "


ध्यानी तुझ्या न आली
अद्याप प्रीत माझी
अन् चित्त चोरण्याचा
माझा स्वभाव नाही

स्वप्नी न पाहिले मजला
अद्याप गे सखे तू
यायचे स्वत:हून स्वप्नी
माझा स्वभाव नाही

गंधित स्मृती याव्या
माझ्या, तुझ्या मनात
पण गुच्छ भेट देणे
माझा स्वभाव नाही

मैफिलीत गीत तू माझे
अद्याप गायिले नाही
अन् गीत लिहण्याचा
माझा स्वभाव नाही

तनी माझ्या स्पर्श तुझा गे
अद्याप मोहरला नाही
मोहोराविना  कूजनाचा
माझा स्वभाव नाही

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

ईतुकेच

" ईतुकेच "


ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
केसात माळण्या आधी
फूल हुंगायाचे होते

ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
चित्र माझे रंगवताना
डोळे वाचायाचे होते

ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
भिजताना श्रावण सरीत
मज बिलगायाचे होते

ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
मैफील संपण्यापूर्वी
माझे गीत गायचे होते

ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
मी तुटलो तारा म्हणूनी
मज वेचायाचे होते

ईतुकेच मला गे तुजला
बस सांगायाचे होते
दिल तुझे साफ होते पण
मजलाच फसायचे होते

------ © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com